पेट्रोलियम वापर जपून करण्याचा दिला सल्ला
हैदराबाद, दि. १० : पश्चिम आशियातील वाढत्या तणावपूर्ण परिस्थिती आणि जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोलियम उत्पादनांचा वापर अत्यंत गरजेनुसार आणि जबाबदारीने करण्याचे आवाहन केले आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि इंधन आयात करणारा देश असल्याने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे सुमारे ९ हजार ३७७ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून अनेक महत्त्वाचे संदेश दिले. यावेळी त्यांनी ऊर्जा बचत, परकीय चलन संरक्षण आणि स्वदेशी वापर वाढवण्यावर विशेष भर दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत ऊर्जा गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांचा वापर केवळ आवश्यकतेपुरताच केला गेला पाहिजे. यामुळे देशाचे परकीय चलन वाचेल आणि जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे आर्थिक परिणामही कमी होतील.
यावेळी पंतप्रधानांनी नागरिकांना नऊ महत्त्वाच्या बाबींवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्यासोबतच खाद्यतेलाचा अपव्यय टाळण्याचे सांगितले. पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळावी, परदेश प्रवास कमी करावा आणि परकीय उत्पादनांच्या खरेदीवर नियंत्रण ठेवावे, असेही त्यांनी सुचवले.
याशिवाय जास्तीत जास्त मेट्रो सेवा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन बैठकींना प्राधान्य द्यावे तसेच कच्चे तेल आणि परकीय चलन बचतीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पश्चिम आशियातील संघर्ष आणि जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. नवीकरणीय आणि पर्यायी ऊर्जा क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत असून सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगातील आघाडीच्या देशांमध्ये पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवण्याच्या धोरणामुळे आयात इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक घरापर्यंत एलपीजी पोहोचविण्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर आता परवडणाऱ्या पाईप गॅस सुविधेचा विस्तार करण्यासाठी सरकार वेगाने काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
केंद्र सरकार सीएनजी आधारित परिसंस्था मजबूत करण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे सांगताना पंतप्रधानांनी ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्यावर भर दिला. भविष्यातील ऊर्जा सुरक्षेसाठी स्वच्छ, पर्यायी आणि देशांतर्गत उपलब्ध ऊर्जास्रोत महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, हैदराबाद येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये हैदराबाद-पणजी आर्थिक मार्गिकेवरील गुडेबेलूर ते महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६७ चे चौपदरीकरण, संगारेड्डी जिल्ह्यातील जहीराबाद औद्योगिक क्षेत्राचा विकास, काझीपेट-विजयवाडा रेल्वे मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पाचे काही टप्पे, ग्रीनफिल्ड पेट्रोलियम टर्मिनल, काझीपेट रेल्वे अंडर-रेल बायपास तसेच वारंगलमधील पीएम मित्र पार्क आणि काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क यांचा समावेश आहे. पायाभूत सुविधा, ऊर्जा स्वावलंबन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही बाबींवर भर देत भारत वेगाने प्रगती करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले.
