इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या आवाहनावर राहुल गांधींची टीका; “हे उपदेश नाहीत, तर अपयशाचे पुरावे”
नवी दिल्ली, दि. ११ : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासियांना इंधन बचत, सोने खरेदी टाळणे आणि परदेश दौरे कमी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनावर काँग्रेस नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी तीव्र प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “हे उपदेश नसून गेल्या १२ वर्षांतील अपयशाचे पुरावे आहेत,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.
हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर अत्यंत गरजेनुसार करावा, असे सांगितले होते. भारत मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम उत्पादनांची आयात करत असल्यामुळे परकीय चलनाचा ताण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी संयमित वापर करावा, असेही ते म्हणाले होते.
यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना काही महत्त्वाची आवाहने केली. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे, खाद्यतेल जपून वापरणे, पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळणे, परदेश प्रवास कमी करणे, परकीय चलनाची बचत करणे, मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर करणे, ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ऑनलाईन बैठकींना प्राधान्य देणे तसेच परकीय उत्पादनांची खरेदी कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
https://x.com/RahulGandhi/status/2053683890741723319?s=20
या विधानांवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. “मोदीजींनी जनतेकडे त्यागाची मागणी केली आहे. हे उपदेश नाहीत, तर सरकारच्या अपयशाची कबुली आहे. १२ वर्षांत देशाला अशा स्थितीत आणले आहे की, आता जनतेला काय खरेदी करावे, कुठे जावे आणि काय करू नये हे सांगावे लागत आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, “स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी प्रत्येक वेळी जनतेवर दोष टाकला जातो. देश चालवणे आता तडजोड केलेल्या पंतप्रधानाच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सभेत ऊर्जा सुरक्षेवर भर देताना भारत नवीकरणीय आणि पर्यायी ऊर्जा क्षेत्रात वेगाने प्रगती करत असल्याचे सांगितले. सौर ऊर्जा निर्मितीत भारत जगातील आघाडीच्या देशांमध्ये पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढवून आयात इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ऊर्जा धोरणाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी प्रत्येक घरापर्यंत एलपीजी सुविधा पोहोचवण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आता परवडणाऱ्या पाईप गॅस पुरवठ्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले. सीएनजी-आधारित पर्यावरणपूरक व्यवस्थेला चालना देण्यासाठीही केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हैदराबाद दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तब्बल ९ हजार ३७७ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, औद्योगिक क्षेत्र विकास, रेल्वे मल्टी-ट्रॅकिंग, ग्रीनफिल्ड पेट्रोलियम टर्मिनल आणि पीएम मित्र पार्कसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश होता.
पश्चिम आशियातील तणाव, जागतिक इंधन संकट आणि आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आवाहनांवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
