नांदेडमधील चार मुलांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्वतःहून दखल; संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील इस्लामपुरा भागात घडलेल्या चार अल्पवयीन मुलांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी स्वतःहून दखल घेतली असून संबंधित प्रशासनाला नोटिसा बजावल्या आहेत. या घटनेने मानवी हक्कांच्या संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
माहितीनुसार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक नागरी संस्थेकडून नाल्याचे बांधकाम सुरू असताना परिसरात अंदाजे १५ फूट खोल खड्ड्यात सांडपाणी साचले होते. त्याच ठिकाणी खेळत असलेल्या चार मुलांनी पाण्याची खोली लक्षात न आल्याने त्या खड्ड्यात प्रवेश केला आणि दुर्दैवाने त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त दि. १७ एप्रिल २०२६ रोजी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना नोटिसा पाठवल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, जर प्रसारमाध्यमांमधील माहिती खरी ठरली, तर ही घटना मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन ठरू शकते. त्यामुळे सादर करण्यात येणाऱ्या अहवालामध्ये पीडित मुलांच्या आरोग्याविषयीची माहिती, घटनास्थळीची परिस्थिती तसेच त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या भरपाईसंबंधी तपशील नमूद करणे आवश्यक आहे.
घटनेनंतर मदतीसाठी आरडाओरड ऐकून स्थानिक नागरिक आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी बचावकार्य सुरू केले, मात्र प्रयत्न करूनही मुलांना वाचवता आले नाही. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयोग पुढील तपासणीची दिशा निश्चित करणार असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
