ग्राहक दिशाभूल रोखण्यासाठी कठोर नियम लागू
मुंबई, दि. २५ : राज्यात पनीरच्या नावाखाली ‘चीज ॲनालॉग’चा वापर करून ग्राहकांची दिशाभूल केल्या जाणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या निर्देशानुसार, आता प्रत्येक हॉटेल, उपहारगृह आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या मेन्युकार्ड तसेच इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर पदार्थात ‘नैसर्गिक पनीर/चीज’ वापरले आहे की ‘चीज ॲनालॉग’, याचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी दि. २५ मार्च २०२६ पासून राज्यभर मोहिमेच्या स्वरूपात सुरू करण्यात आली असून, यास अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाकडूनही पाठिंबा देण्यात आला आहे. केंद्रस्तरावरूनही यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
मंत्री नरहरी झिरवळ यांनी सांगितले की, अनेक हॉटेल्समध्ये पनीरऐवजी स्वस्त पर्याय म्हणून वनस्पतीजन्य फॅट्सपासून तयार केलेल्या ‘चीज ॲनालॉग’चा वापर केला जातो. मात्र ग्राहकांना याबाबत माहिती दिली जात नसल्याने ही दिशाभूल ठरते. त्यामुळे आता मेन्युकार्डवर स्पष्टपणे घटक नमूद करणे कायदेशीर बंधनकारक करण्यात आले आहे.
नव्या नियमांनुसार, पनीर म्हणून ‘चीज ॲनालॉग’ विक्री करताना आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत ग्राहकांची दिशाभूल करणे हा दंडनीय गुन्हा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सचा परवाना रद्द करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
प्रशासनाचे महत्त्वाचे निर्देश
- ‘चीज ॲनालॉग’ पुरवठादारांनी विक्री बिलावर त्याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक
- सर्व विभागीय अन्न सहआयुक्तांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश
- हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरर्सना संदेशांद्वारे नियमांची माहिती देण्यात येत आहे
पनीर आणि चीज ॲनालॉगमधील फरक
अन्न सुरक्षा मानके विनियम २०११ नुसार पनीर हा केवळ दुधापासून तयार होणारा पदार्थ आहे. तर ‘चीज ॲनालॉग’ हा खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटकांच्या मिश्रणातून तयार केला जातो. तो दिसायला पनीरसारखा असला तरी त्याची गुणवत्ता आणि घटक वेगळे असतात. त्यामुळे ग्राहकांना नेमके काय दिले जात आहे, याची माहिती मिळावी हा या निर्णयामागील उद्देश आहे.
तक्रार नोंदविण्यासाठी आवाहन
ग्राहकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना दक्षता घ्यावी. दिशाभूल झाल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.
