नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; कथित सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी सीबीआयच्या ताब्यात
लातूर, दि. १५ : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई करत कथित सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी याला ताब्यात घेतले आहे. सीबीआयने लातूर येथून ही कारवाई केली असून, कुलकर्णीचा राष्ट्रीय परीक्षा संस्थेशी संबंध असल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच परीक्षा होण्यापूर्वीच फुटल्याचा आरोप झाल्यानंतर हे प्रकरण देशभर चर्चेत आले होते.
वैद्यकीय शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेचा पेपर ३ मे रोजी झालेल्या परीक्षेपूर्वीच बाहेर आल्याचे उघड झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, आता तपास यंत्रणांनी मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचल्याचा दावा केला आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पी. व्ही. कुलकर्णी हा पुण्यात रसायनशास्त्र विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. सुमारे चार वर्षांपूर्वी तो सेवानिवृत्त झाला असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेशी संबंधित काही कामांमधून त्याचा संपर्क वाढला होता आणि त्याच माध्यमातून प्रश्नपत्रिका गळतीचे जाळे उभे राहिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणातील महाराष्ट्र कनेक्शन उघड झाल्यानंतर लातूर शहर सीबीआयच्या रडारवर आले होते. दोन दिवसांपासून सीबीआयच्या विविध पथकांकडून लातूरमध्ये चौकशी आणि तपास मोहीम सुरू होती. त्यानंतर कुलकर्णीला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिच्याशी कुलकर्णीचे संबंध असल्याचेही समोर आले असून, याच धाग्यावरून तपास यंत्रणा लातूरपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
लातूरमधील कैलासनगर परिसरातील कुलकर्णीच्या घराला सध्या कुलूप असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. त्याचे कुटुंब सध्या पुण्यात वास्तव्यास असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, सीबीआयचे आणखी एक पथक लातूरमध्येच ठाण मांडून असून, संबंधित कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू आहे.
या तपासादरम्यान लातूरच्या सुतमील परिसरातील एका खासगी क्लास चालकाच्या निवासस्थानीही सीबीआयने तब्बल ११ तास तपासणी केली. या कारवाईत काही महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तपास यंत्रणा आता पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटचा आर्थिक आणि तांत्रिक मागोवा घेत असून, आणखी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. परीक्षा प्रक्रियेतील सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात असून, केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
