‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांचा प्रकाशकाला फोनवरून जीवे मारण्याचा इशारा
मुंबई, दि. २३: महाराष्ट्रात राजकीय आणि वैचारिक वादाला पुन्हा एकदा उधाण आले असून दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी सुमारे ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोप आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून संतप्त प्रतिक्रिया देत प्रकाशकाला उद्देशून म्हटले—
“अरे गोविंद पानसरे हा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकेरीत शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहितीये ना, त्या गोविंद पानसरेचं काय झालं, त्याची अवस्था काय झाली? मी तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन.”
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी घडल्याने त्यावर अधिक चर्चा रंगली आहे.
दरम्यान, प्रकाशक प्रशांत आंबी यांनी शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत गायकवाड यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हे पुस्तक मी नव्हे तर प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी लिहले आहे. हे पुस्तक १९८८ साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नाही. तुम्ही आधी ते पुस्तक वाचा.”
मात्र, या स्पष्टीकरणानंतरही संजय गायकवाड यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत शिवीगाळ आणि धमक्या देणे सुरूच ठेवल्याचा आरोप आहे. त्यावर प्रशांत आंबी यांनी ठाम भूमिका घेत प्रत्युत्तर दिले, “तुम्ही उद्या माझी जीभ कापायला या.”
या संपूर्ण प्रकरणावरून वातावरण चिघळले असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर आमदार संजय गायकवाड यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय गायकवाड यांची कारकीर्द यापूर्वीही वादग्रस्त ठरली आहे. आमदार निवासातील कँटिनमध्ये अन्नाच्या गुणवत्तेवरून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिल्याची चर्चा होती. मात्र, ताज्या घटनेतून त्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल झालेला नसल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी होत असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, साहित्य आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांविषयी आदर या मुद्द्यांवर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
