नवी मुंबईत २२ एप्रिल रोजी १२ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
नवी मुंबई, दि. २० : नवी मुंबई महानगरपालिकेकडून विविध जलवाहिन्यांवरील दुरुस्ती व तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार असल्याने बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी शहरातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, सी. बी. डी. सेक्टर-२८ येथील पंप हाऊस येथे मॅनिफोल्ड व व्हॉल बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कळंबोली सर्कल, नेरुळ सेक्टर-१९ व वंडरपार्क परिसरातील जलवाहिन्यांवर व्हॉल बसविण्याची कामेही पार पडणार आहेत. तसेच घणसोली सेक्टर-२ येथे ९०० मि.मी. व्यासाच्या पाईपलाईनचे जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या सर्व कामांमुळे मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत, म्हणजेच सुमारे १२ तास बंद राहणार आहे.
या कालावधीत, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे आणि ऐरोली या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विभागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तसेच मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडणी असलेल्या भागांमध्ये आणि सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोडमध्येही पाणीपुरवठा बंद राहील.
याशिवाय, २२ एप्रिल रोजी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नसून गुरुवार, दि. २३ एप्रिल रोजी सकाळचा व संध्याकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. महापालिकेने नागरिकांना आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवण्याचा आणि या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
