‘युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड’ २०२६ मध्ये भारताचा ऐतिहासिक ठसा; सुवर्णासह तीन पदकांची कमाई
मुंबई, दि. १६ : ‘युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड’ (ईजीएमओ) २०२६ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत इतिहास रचला आहे. फ्रान्समधील बोर्दो येथे ९ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत भारताच्या चार सदस्यीय पथकाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकत देशाला गौरव मिळवून दिला.
या स्पर्धेत भारतीय स्पर्धकाने प्रथमच सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला असून, एकूण सांघिक कामगिरीच्या बाबतीतही भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम नोंद केली आहे. एकूण ६७ देशांच्या सहभागात भारताने ६वे स्थान मिळवले असून, २०१५ पासून या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतरची ही सर्वोच्च क्रमवारी ठरली आहे.
पदक विजेत्यांमध्ये मुंबई, महाराष्ट्र येथील श्रेया शंतनू मुंदडा हिने सुवर्णपदक, केरळमधील संजना फिलो चॅको हिने रौप्यपदक, तर तमिळनाडूतील शिवानी भारत कुमार हिने कांस्यपदक मिळवले. या यशामुळे भारतीय विद्यार्थिनींच्या गणितातील प्रावीण्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
भारतीय संघाचे नेतृत्व डॉ. वैदेही थत्ते (नेता), डॉ. मृदुल थत्ते (उपनेता) आणि अदिती मुठखोड (निरीक्षक) यांनी केले. भारताने संपूर्ण महिला संघ पाठवण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे.
या वर्षीच्या स्पर्धेत एकूण २६० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या, त्यापैकी ४२ युरोपीय देशांतील १६१ विद्यार्थिनींचा समावेश होता. भारत २०१५ पासून या स्पर्धेत अतिथी राष्ट्र म्हणून सातत्याने सहभाग नोंदवत आहे.
या यशामागे ‘ईजीएमओ प्रशिक्षण शिबीर’ अंतर्गत दिले जाणारे सखोल प्रशिक्षण, तसेच माजी ऑलिम्पियन आणि गणित संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातात. अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत राष्ट्रीय उच्च गणित मंडळाचेही या उपक्रमाला पाठबळ लाभत आहे.
गणित, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात देशातील विद्यार्थिनींची वाढती कामगिरी अधोरेखित करणारे हे यश मानले जात असून, भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय सहभाग अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
