१९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा उपकर्णधार अभिज्ञान कुंडू याचा नवी मुंबई महानगरपालिकेत गौरव
नवी मुंबई, दि. २२: वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयानंतर संघातील उपकर्णधार व यष्टिरक्षक-फलंदाज अभिज्ञान अभिषेक कुंडू याचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विशेष सत्कार करण्यात आला. महापौर सौ. सुजाता पाटील यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, क्रीडा समिती सभापती गिरीश म्हात्रे, उपसभापती राजू मढवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच अभिज्ञान कुंडू यांचे प्रशिक्षक चेतन जाधव यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
महासभेत एकमताने अभिनंदन प्रस्ताव
सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावास विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी अनुमोदन दिले. महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनीही अभिज्ञानच्या कामगिरीचे कौतुक करत त्याला उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.
विश्वचषकातील दमदार कामगिरी
फेब्रुवारी २०२६ मध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे पार पडलेल्या आयसीसी १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अभिज्ञान कुंडू यांनी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत उत्कृष्ट खेळ केला. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी ४ अर्धशतके झळकावत एकूण २३९ धावा केल्या. संघातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्यांची नोंद झाली.
अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताने विजय मिळवत विश्वचषक जिंकला, त्या विजयी संघाचा ते महत्त्वाचा भाग होते. यष्टिरक्षणासोबतच फलंदाजीतही त्यांनी सातत्यपूर्ण योगदान देत संघाच्या यशात मोलाची भूमिका बजावली.
आशिया कपमध्येही विक्रम
यापूर्वी २०२५ मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत अभिज्ञान कुंडू यांनी जलद द्विशतक झळकावत नाबाद २०९ धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे त्यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात मोठा वाटा उचलला.
कोपरखैरणे येथे वास्तव्यास असलेला अभिज्ञान कुंडू हा नवी मुंबई शहराचा उदयोन्मुख खेळाडू असून, त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. महानगरपालिकेच्या वतीने त्याचा गौरव करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार सोहळ्यामुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
