चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा शानदार समारोप

कविवर्य कुसुमाग्रज नगरीत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप काल सायंकाळी झाला. त्यावेळी निवृत्त सरन्यायाधीश गवई बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), दिग्दर्शक पद्मश्री डॉ. जब्बार पटेल, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मराठी भाषा विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, संगीतकार अजय आणि अतुल गोगावले, उपमहापौर विलास शिंदे, तारपा वादक पद्मश्री भिकल्या धिंडा आदी उपस्थित होते.
न्या. गवई म्हणाले, कला, साहित्य जोपासण्यासाठी राजाश्रय आवश्यक आहे. राज्यातील कला, संस्कृती संतांनी जोपासली. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही कलाकरांचा सन्मान केला. राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात कलाकरांना राजाश्रय मिळाला होता. मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी अशा प्रकारची संमेलन महत्वपूर्ण भूमिका निभावतात, असे सांगून त्यांनी पुरस्कार प्राप्त कलाकारांचे कौतुक केले. नाशिकसारख्या ऐतिहासिक नगरीत हे संमेलन होत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.
