‘धुकं नव्हतं, धोका होता’ — अमोल मिटकरींच्या शंकेनंतर संजय राऊतांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
मुंबई, दि. २: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कथित विमान अपघातासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी तीव्र संशय व्यक्त केल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या प्रकरणावरून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “विमान अपघातावेळी तिथं धुकं नव्हतं, धोका होता” असा दावा अमोल मिटकरी यांनी केल्यानंतर हे प्रकरण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
‘हा पक्ष आता पवार-पाटलांचा राहिलेला नाही’ — खा. संजय राऊत
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या पक्षाच्या राजकीय प्रवासावरही भाष्य केलं. पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल असल्याचा दावा केल्यानंतर त्यावर यु-टर्न घेतल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “अजित दादांचा पक्ष हा आता पवार, पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. तो आता गोयल, पटेल, पारेख, शाह, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहरांचा पक्ष होता. सुरुवातीला अजितदादांचा पक्ष हा शाहांचा पक्ष होता. आता तो पटेल यांचा पक्ष होईल आणि महाराष्ट्रातील एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकला आहे.”
“स्वगृही परतण्यासाठी धडपड सुरू होती, पण…”
अजित पवार आणि भाजप यांच्यातील संबंधांवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “अजित पवार यांनी कधीही भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केले नाही. सत्तेसाठी ते एकत्र आले. त्यांच्यावर भाजपने काही संकटं लादली. घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी, सीबीआय मागे लावले. त्यामुळे इतर राजकारणी जसे करतात तसेच त्यांनी केले. तेवढ्यापुरतेच अजितदादा भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्या वरच्या फाईल क्लिअर करून घेतल्या. त्यानंतर ते पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “भाजपला विचारल्याशिवाय विलिनीकरणाची चर्चा होणार नाही” या वक्तव्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच, असे नाही. अजित पवार त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीने भाजपसोबत गेले. त्यांना कदाचित वाटले की भाजप हा आपल्या विचारांचा पक्ष नाही. जर अजित पवारांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली नसेल तर त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल. इतर शंभर लोक म्हणतात ते खोटे आणि फडणवीस म्हणतात ते खरे हे चुकीचे आहे. आज दादा नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावावर कोणतीही बिले फाडू नयेत.”
“दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का?”
कथित विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले, “हे प्रकरण साधे नाही. अजित पवार मागे फिरले असते तर भारतीय जनता पक्षाची दहशत मोडून गेली असती. अजित पवार वारंवार सांगत होते की, माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी ती उघड करेन. हे त्यांनी १५ जानेवारी रोजी सांगितले आणि पुढील दहा दिवसात त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. हे रहस्यमय आहे. मला जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाली.”
राऊत यांनी अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्नही गंभीर असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले, “जर विमानातून सहा जण प्रवास करत होते तर पाच मृतदेह कसे काय मिळाले? मग सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? सगळे देह जाळून खाक झाले. मात्र त्याचवेळी अजितदादांच्या जवळ असलेले कागद जळालेले नाहीत. दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ते मुंबईतून फाईल बारामतीत सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का?”
तपास व अधिकृत माहितीची प्रतीक्षा
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विविध राजकीय नेते संशय व्यक्त करत असले तरी अधिकृत तपास यंत्रणांकडून स्पष्ट आणि अंतिम माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आरोप, प्रत्यारोप आणि शंका यांवरून चर्चेला उधाण आलं असताना, सत्य बाहेर येण्यासाठी पारदर्शक तपासाची मागणी राजकीय वर्तुळातून होत आहे.
