“धरती आबा योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील ६३५ गावांचा समावेश” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- राज्यातील ३२ जिल्ह्यांना योजना लागू होणार
पालघर दि. १७ : देशातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत राज्यातील ३२ जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील ६३५ गावांचा समावेश होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ पालघर जिल्ह्यातील मनोर येथे करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, (दूरदृश्यप्रणालीद्वारे) आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी मंत्री रवींद्र चव्हाण ,खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, स्नेहा दुबे– पंडित, राजन नाईक, हरिश्चंद्र भोये, निरंजन डावखरे, आदिवासी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे उपस्थित होते.

धरती आबा योजनेंतर्गत गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, प्रत्येक घरात वीज, प्रत्येक घरात गॅस जोडणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, माता कल्याण, पोषण आहार अशा एकूण 25 योजना धरती आबा योजनेच्या माध्यमातून लागू करण्यात येणार आहेत. ज्या गावांमध्ये 500 पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या आहे तसेच ज्या गावात 50 टक्के पेक्षा जास्त आदिवासी समाज राहतो अशा गावांचा समावेश या योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. राज्यातील पालघर, गडचिरोली यांसह इतर दोन जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये 50 आदिवासी लोकसंख्या असेल तरी ते गाव धरती आबा योजनेंतर्गत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

वैयक्तिक पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीस तर सामूहिक पद्धतीमध्ये आदिवासी समूहाचा या योजनेमध्ये विचार करण्यात येणार असून 17 विभागाच्या 25 विविध योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनेंतर्गत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा मिळणार आहेत. आदिवासी समाजामध्ये धरती आबा योजनेमुळे परिवर्तन होणार असून आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी ही मोठी संधी आहे.

भगवान बिरसा मुंडा यांना धरती आबा असे म्हटले जात असे. पारतंत्र्याच्या काळामध्ये इंग्रज राजवटीविरुद्ध भगवान बिरसा मुंडा यांनी बंड करून आदिवासी समाजाला न्याय दिला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पालघर जिल्ह्यामध्ये तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार – पालकमंत्री गणेश नाईक

येत्या काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या माध्यमातून दहा लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचा मूलभूत आराखडा तयार करून तो कृतीमध्ये आणण्यासाठी सर्व विभागांना शंभर दिवसाचा सात कलमी कार्यक्रम दिला होता. तो सर्व विभागाने यशस्वीरित्या पूर्ण केला असून येत्या काळात दीडशे दिवसाचा कृती आराखडा देण्यात येणार आहे. या आराखड्याबाबत प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने कामाला लागली असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
वन विभागामार्फत राज्यात 11 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने वन विभागाची गतिमान पद्धतीने वाटचाल सुरू आहे. तसेच येत्या साडेचार वर्षांमध्ये आठ 250 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट वन विभागाने ठेवले आहे. पालघर जिल्हा निसर्गरम्य जिल्हा आहे. आता या जिल्ह्याची प्लास्टिक मुक्त पालघर जिल्हा दुर्गंधी मुक्त पालघर जिल्हा या ध्येयाकडे वाटचाल चालू असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
