“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारे अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करावे” – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई, दि. २७ : मुंबई विद्यापीठ हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शिक्षणाचे स्थळ असून त्यांच्या जीवन आणि कार्याला समर्पित अभ्यास आणि संशोधन केंद्र दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारे अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करण्याचे प्रयत्न व्हावे, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठ येथील सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, यांच्या प्रमुख उपस्थिती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे (ऑनलाइन) उद्घाटन आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार अतुल भातखळकर, पराग अळवणी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरु अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर विद्वान, कवी, इतिहासकार, पुरोगामी विचारवंत आणि अग्रणी समाजसुधारक होते. ते अस्पृश्यतेच्या सामाजिक दुष्कृत्याच्या विरोधात होते. त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रथेला पाप आणि माणुसकीवरील कलंक मानले. ते रूढीवादाच्या विरोधात उभे राहिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही जातीभेद निर्मूलनासाठी सावरकरांच्या कार्याचे आणि वचनबद्धतेचे कौतुक केले होते.
मुंबई विद्यापीठात स्थापन होत असलेले हे अभ्यास आणि संशोधन केंद्र सावरकरांचे साहित्य, विचार आणि तत्त्वज्ञान यांना प्रोत्साहन देईल तसेच त्यांचा प्रसार करेल असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.

“स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्रासाठी आवश्यक निधी देणार” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राच्या माध्यमातून सावरकरांचा जीवनप्रवास उलगडेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये इतकी ताकद होती की, त्यांतील एक-एक पैलूंवर समग्र संशोधन करता येईल. त्यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात स्थापन संशोधन केंद्रास आवश्यक निधी दिला जाईल.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे आणि ब्रिटिश सरकारविरुद्धच्या कृतीमुळे ब्रिटिशांनी त्यांची बॅरिस्टर पदवी काढून घेतली. ही पदवी परत मिळवण्यासाठी विद्यापीठाने सविस्तर प्रस्ताव तयार करावा. राज्यशासन यासंदर्भात इंग्लंडमधील संबंधित संस्थांशी पत्रव्यवहार करेल आणि त्यांना मरणोत्तर बॅरिस्टर पदवी देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असून, लहानपणीच स्वातंत्र्यालढ्यात सहभागी होऊन त्यांनी ‘अभिनव भारत’ सारखी संस्था स्थापन केली. इंग्रज ज्याला ‘सिक्रेट सोसायटी’ म्हणत. या संस्थेच्या माध्यमातून भारतीयत्व आणि भारतीय स्वातंत्र्याबाबत जनजागृती, संघटन करून त्यांनी क्रांतीला चालना दिली. विशेषतः जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे त्यांनी भाषांतर केले आणि क्रांतीसंदर्भातील धडे देण्याचे काम केले. सन १८५७ च्या युद्धाला सुरुवातीला ‘शिपाई बंड’ असे संबोधले गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी या संघर्षाला केवळ शिपायांचं बंड न मानता, तो एक स्वातंत्र्यलढा होता, असे ठामपणे सांगितले. ‘भारतीय इतिहासातील सहा सुवर्णपाने’ या त्यांच्या पुस्तकातून इंग्रजांच्या दडपशाहीखाली दडपलेला इतिहास त्यांनी समाजासमोर आणला. त्यांचा आत्मविश्वास, धाडस आणि निर्णायक कृती आजही प्रेरणादायी ठरते. देशासाठी झगडताना त्यांनी कधीही हार मानली नाही. बौद्धिक, सामाजिक आणि क्रांतिकारी योगदान दिले. आजच्या पिढीसाठी त्यांचे योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
