राज्यभरातले १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी देणार परीक्षा
मुंबई/पुणे, दि. १०: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या राज्यभरातले १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून त्यासाठी ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळानं २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान, कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातल्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याने निगराणी ठेवली जाणार आहे. तसंच, परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिघातली झेरॉक्स केंद्र परीक्षा काळात बंद ठेवण्यात येतील आणि या काळात जमावबंदीचे आदेशही देण्यात आले आहेत. कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार घडला तर संबंधितांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा मंडळाने अधिकृत पत्रकाद्वारे दिला आहे.
Source – AIR
