काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा – मुख्यमंत्री
मुंबई: काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली. उत्तर-पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ अंधेरी पूर्वेकडील सुभाषनगर येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते.
देशात अनेक वेळा काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेस कधीच गरिबी हटवू शकत नाही, उधारीचा वायदा आहे. ५५ वर्षांत काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार, दुराचार यांची मालिका सुरू ठेवली आहे, अशी टीकादेखील मुख्यमंत्र्यांनी केली.
राज्यात गजानन कीर्तिकरांसारखे नेतृत्व हवे असे सांगतानाच संसदेत प्रश्न विचारणाऱ्या देशातील पाच खासदारांमध्ये कीर्तिकरांचा समावेश असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
पूर्वी सायकल, मोटर यांसारखी वाहनं भाडय़ाने घेतली जात होती, आता राष्ट्रवादी काँग्रेसने इंजिन भाडय़ाने घेतले आहे पण केवळ खोटे बोलून तोंडाच्या वाफेने इंजिन चालत नसते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता घणाघाती टोला लगावला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार विद्या ठाकूर तसेच महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
