कोर्लई लाईटहाऊस व किल्ल्यापर्यंत च्या मार्गाची रुंदी वाढवण्याची होतेय मागणी
अरुंद वाटेमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता
अलिबाग/मुरुड, दि.८: सध्या कोकणात पर्यटन विकासाच्या नावाखाली नियोजनशून्यरित्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात असल्याचा एक नमुना समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील अलिबाग मुरुड मार्गावर कोर्लई किल्ला व त्याला लागूनच लाईट हाऊस आहे. येथे वर्षभर दुर्गप्रेमी व पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो. विशेष म्हणजे हा किल्ला चढायला सोपा असून येथून सिंधू सागराचे (अरबी समुद्राच) विहंगम दृश्य पाहायला मिळते). परंतु या ठिकाणी पोहोचणे म्हणजे मोठे दिव्यच आहे. कोर्लई गावात प्रवेश केल्यावर थोड्याच अंतरावर केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या लाईट हाऊस विभागाने नव्याने बांधलेल्या रस्त्याची हद्द सुरू होते. एकावेळी एकच चारचाकी वाहन जाऊ शकते एवढ्या कमी रुंदीचा हा रस्ता असून समोरून जर कोणते वाहन आले तर गाडी रिव्हर्स गिअर ला टाकून आपली सुटका करून घेण्याशिवाय गत्यंतर नाही. एका बाजूला ५० ते ६० फूट खोल दरी तर दुसऱ्या बाजूला पुरातत्त्व खात्याच्या आखत्यारीतील डोंगराचा भाग यामुळे पर्यटकांना येथून चारचाकी वाहन चालवताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

रविवार दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजीही या ठिकाणी असाच पेचप्रसंग उद्भवला होता. नेहमीप्रमाणे आलेल्या पर्यटकांनी आपली वाहने या मार्गावर नेली खरी परंतु पुढे कोर्लई लाईट हाऊस विभागाच्या गेटवर गेल्यावर त्यांना सांगण्यात आले की कोविडच्या कारणामुळे लाईट हाऊस व कोर्लई किल्ला दोन्हीही बंद असून तुम्हाला तुमची वाहने येथे पार्क करता येणार नाहीत. यावेळी युटर्न घेतलेल्या पर्यटकांची वाहनं व समोरून येणारी दुसरी वाहनं एकमेकांसमोर उभी ठाकली. साधारण पाऊण तासांनी एका वळणावर दरीच्या कडेला कसरत करत अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहनं बाहेर काढावी लागली. मुळात हा रस्ता बांधताना जास्त रुंदीचा बांधणं गरजेचं होतं परंतु असं सांगितलं जातं की पुरातत्व खात्यातील अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे सगळी गोची झाली. परंतु गत रविवारच्या घटनेवरून किमान लाईट हाऊस विभागाने स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने येथे बॅरिकेडींग करून पर्यटकांचे या मार्गावरून पुढे जाण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे. भविष्यात या मार्गावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काळात हा रस्ताही रुंद करण्याची प्रक्रिया सुरू होणे संबंधित विभागाकडून अपेक्षित आहे. याविषयी महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम ने कोर्लई लाईट हाऊसच्या अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु अद्याप त्यांच्याशी संपर्क झालेला नाही नाही.
पर्यटन विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध पावलं उचलली जात असल्याच्या फक्त बातम्याचा समोर येतात परंतू प्रत्यक्ष विकास हा कागदावरच होतोय असे दिसते. अलिबाग व मुरुड तालुक्यांत अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या समस्यांचा स्थानिकांना व पर्यटकांना सामना करावा लागतोय. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी आशा आहे.
