Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी समर्पक स्वदेशी उत्पादन : पाणवनस्पतींपासून तयार केलेल्या मूरहेन योगा मॅट

आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी समर्पक स्वदेशी उत्पादन : पाणवनस्पतींपासून तयार केलेल्या मूरहेन योगा मॅट

चांद प्रार्थना

आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन संयुक्त राष्ट्रांची जवळपास १३ शाश्वत विकास ध्येये साध्य करण्यात मदत करणाऱ्या  पाणवनस्पतींपासून तयार केलेल्या मूरहेन योगा  मॅट / चटया या ईशान्य भारतातील स्वदेशी उत्पादनाविषयी अधिक जाणून घेऊया.

आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये १००% जैवविघटनशील योगा चटयांचा वापर करण्यात यावा अशा अर्थाचा कार्यालयीन आदेश भारत सरकारने  निर्गमित केला आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांची जवळपास १३ शाश्वत विकास ध्येये साध्य करण्यात मदत करणाऱ्या आणि ईशान्य भारतातील स्वदेशी उत्पादन असणार्या पाणवनस्पतींपासून तयार केलेल्या मूरहेन योगा चटया यासाठी एक लोकप्रिय आणि समर्पक उत्पादन ठरते.

‘व्होकल फॉर लोकल’ अभियानातील उपक्रम म्हणून ग्रामीण महिलांना शाश्वत स्वरुपाची उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पाणवनस्पतींची बेसुमार वाढ आणि अतिरिक्त संचय यापासून पाणथळ जमिनींचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार या चटयांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. या चटया सुती कॅनव्हासच्या पिशव्यांमध्ये वितरीत होतात आणि या पिशव्यांना कोणतीही धातूची चेन किंवा पिशवी बंद करण्यासाठी धातूच्या इतर साधनांचा वापर केलेला नाही. या पिशव्यांचे जैवविघटनकारी स्वरूप लक्षात घेऊनच त्यांना कमी-जास्त करता येऊ शकणारे पट्टे तसेच पिशवी बंद करण्याची साधने बसविली आहेत. या चटयांची किंमत सुमारे ९०० रुपये आहे.

टाकाऊ गोष्टींपासून निर्मिती

पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पती दिसायला कितीही सुंदर असल्या तरीही, गुवाहाटी शहराच्या आग्नेयेला असलेल्या दीपोर बील या कायमस्वरूपी गोड्या पाण्याच्या तलावामध्ये मात्र या वनस्पतींमुळे बऱ्याच समस्या निर्माण होत आहेत. रामसर स्थळ म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची पाणथळ जागा असलेल्या दीपोर बील आणि परिसरातील पक्षी वन्यजीव अभयारण्य या ठिकाणांना अनेक गंभीर प्रकारच्या पर्यावरणीय ऱ्हासाला तोंड द्यावे लागते आहे आणि पाणवनस्पतींची बेसुमार वाढ आणि अतिरिक्त संचय हे त्याच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण ठरले आहे.

मूरहेन योगा  मॅट / चटया

पाणवनस्पतींच्या वर्तनविषयक गुणधर्मांचे सर्व पैलू आणि चटईसारख्या वस्तूच्या उत्पादनासाठीच्या कार्यकारी गरजा लक्षात घेऊन हाताने विणलेल्या १००% जैवविघटनशील आणि १००% खतामध्ये रुपांतरीत होऊ शकणाऱ्या योगा चटयांची संकल्पना अस्तित्वात आली. आसाममधील गुवाहाटी येथे असलेल्या दीपोर बील वन्यजीव अभयारण्यातील निवासी पक्षी पर्पल मूरहेन – ज्याला तिथे कामसोराय अर्थात जांभळी पण कोंबडी असे म्हटले जाते – त्या पक्षाच्या नावावरून या चटयांचे नामकरण मूरहेन योगा चटया असे करण्यात आले आहे. आसामच्या पारंपरिक हातमागावर पाणवनस्पतीचे विणकाम करून, विविध प्रकारची कौशल्ये, साहित्य आणि साधने यांच्या संयोजनातून उच्च दर्जाच्या जैवविघटनशील चटयांचे उत्पादन करण्यात येते.

उत्पादन वाढविण्यासाठी तंत्रज्ञानविषयक हस्तक्षेप

चटया तयार करण्यासाठी पाणवनस्पतींचा वापर करण्यापूर्वी त्यांचे संकलन करणे, वाळविणे आणि इतर तयारी करणे ही मूरहेन योगा चटयांच्या निर्मितीमधील अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. नुकत्याच कापलेल्या आणि तलावातून संकलित केलेल्या १२ किलो पाणवनस्पतींपासून प्रत्येक चटईसाठी आवश्यक असणाऱ्या सुमारे दोन किलो पाणवनस्पती मिळवता येतात. या पाणवनस्पतींमधील पाणी पूर्णपणे सुकण्यासाठी जवळपास १५ दिवस लागतात.

मात्र, तंत्रज्ञानातील सौर वाळवण यंत्रासारख्या लहान अभिनव संशोधनांमुळे हा कालावधी ३ दिवसांपर्यंत कमी होतो. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे, ईशान्य भागातील सहा महिने कालावधीच्या दीर्घ पावसाळ्यामुळे (मे ते ऑक्टोबर) या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसाने वाया जाणारा वेळ देखील भरून निघतो .

ग्रामीण महिलांसाठी शाश्वत उपजीविका

दीपोर बील तलावाच्या परिसरात राहणाऱ्या मच्छिमार समाजातील महिला या चटया तयार करतात. तंतू निर्मिती प्रकियेसंदर्भात तसेच त्यांच्या पर्यावरणात आढळणाऱ्या जलपर्णी आणि इतर पाणवनस्पतींसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून विविध उत्पादने तयार करण्याच्या बाबतीत या महिलांनी स्वतःला प्रशिक्षित केले आहे.

कोविड-१९ महामारीच्या काळात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या एनईसीटीएआर या स्वायत्त संस्थेने पाणवनस्पतींसारख्या गोष्टींपासून उत्पन्न मिळविण्यासाठी संपूर्ण महिला समुदायाला सहभागी करून घेणारा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. आज घडीला, किओतपारा, नोतून बास्ती आणि बोर्बोरी या तीन किनारी गावांमधील ३८ महिला आठवड्यातील सहा दिवस या संस्थेसोबत काम करतात आणि पाणवनस्पतींमध्ये असणाऱ्या नैसर्गिक धाग्यांचा वापर करून योगा चटया तयार करतात.

पाणवनस्पती काढून घेतल्यामुळे पाणथळ जागांवरील जलीय परिसंस्थेत सुधारणा, समाजाच्या सहभागातून उपयुक्त वस्तूंचे शाश्वत उत्पादन आणि संपूर्णपणे ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी स्वदेशी समुदायांकरिता रोजगार निर्मिती असे विविध पर्यावरणीय आणि सामाजिक लाभ योगा चटयांच्या उत्पादनातून होतात.

 

*लेखिका मुंबईच्या पत्रसूचना कार्यालयात माध्यम आणि संपर्क अधिकारी आहेत.

छायाचित्र सौजन्य : एनईसीटीएआरकेंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *