मुख्यमंत्री सहाय्यता निधीची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरू : रुग्णालयातून थेट अर्ज, ८ तासांत मंजुरी
मुंबई, दि. १२ : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना उपचारासाठी मिळणारी आर्थिक मदत आता अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली नवीन अद्ययावत ऑनलाईन प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार असून, यामुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया केवळ ८ तासांत पूर्ण होणार आहे.
या नव्या प्रणालीची विशेष बाब म्हणजे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. रुग्णाने आवश्यक कागदपत्रे संबंधित रुग्णालयात सादर केल्यानंतर, तेथील प्रशासनच थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संलग्न प्रणालीद्वारे अर्ज सादर करणार आहे. त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी, अर्ज प्रक्रिया आणि मंजुरी यामध्ये होणारा विलंब मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षात मागील काही काळापासून रुग्णस्नेही आणि पारदर्शक बदल करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे नियमांनुसार पूर्ण असल्यास, अर्जाची तपासणी व मंजुरी प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
राज्यातील वैद्यकीय मदतीच्या कामगिरीबाबतही लक्षणीय प्रगती झाली असून, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन प्रणालीमुळे ही मदत अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, रुग्णांना वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत, हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. नव्या प्रणालीमुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होईल आणि रुग्णांना तातडीने आर्थिक सहाय्य मिळेल.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार असून, त्यानंतर ती संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल. अधिक माहितीसाठी गरजू रुग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
