Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वाराणसी येथील जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ – ‘एमव्ही गंगा विलास’चे लोकार्पण

“पूर्व भारतातील अनेक पर्यटन स्थळांना एमव्ही गंगा विलास क्रूझचा होणार फायदा” – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

वाराणसी/नवी दिल्‍ली, दि. १३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसी येथे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ-एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवला आणि टेंट सिटीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अन्य देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी देखील केली. रिव्हर क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान करत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, या सेवेच्या प्रारंभामुळे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली रिव्हर क्रूझची  प्रचंड क्षमता वापरात येईल आणि भारतासाठी रिव्हर  क्रूझ पर्यटनाच्या नव्या  युगाचा प्रारंभ करेल.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भगवान महादेवाला वंदन केले आणि लोहरीच्या पवित्र सणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या सणांमधील दान, श्रद्धा, तपस्या आणि श्रद्धेचे महत्व आणि त्यातील नद्यांची भूमिका यावर पंतप्रधानांनी भर दिला. यामुळे नदी जलमार्गाशी संबंधित प्रकल्प अधिक महत्वपूर्ण ठरतात असे ते म्हणाले. आज काशी ते दिब्रुगढ या सर्वात लांब रिव्हर क्रूझचा प्रारंभ होत असून यामुळे उत्तर भारतातील पर्यटनस्थळे जगाच्या पर्यटन नकाशावर  येतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज वाराणसी, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार, आसाम येथे १००० कोटी रुपयांच्या इतर प्रकल्पांचे राष्ट्रार्पण होत आहे, यामुळे पूर्व भारतातील पर्यटन आणि रोजगार क्षमतांना चालना मिळेल असे ते म्हणाले.

प्रत्येक भारतीयाच्या जीवनातली गंगा नदीची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला की, स्वातंत्र्योत्तर काळात गंगा नदीच्या किनार्‍यालगतचा  परिसर विकासात मागे राहिला आणि त्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणावर लोक दुसरीकडे स्थलांतरित झाले. या दुर्दैवी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानांनी दुहेरी दृष्टिकोन विशद  केला. एकीकडे नमामि गंगेच्या माध्यमातून गंगा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली तर दुसरीकडे ‘अर्थ गंगा’ ही मोहीम हाती घेण्यात आली. ‘अर्थ गंगा’ मध्ये ज्या राज्यांमधून गंगा नदीचा प्रवाह जातो, त्या राज्यांमध्ये आर्थिक गतिशीलतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत..

क्रूझच्या पहिल्या प्रवासाला निघालेल्या परदेशातील पर्यटकांना थेट संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “आज भारतात सर्व काही आहे आणि तुमच्या कल्पनेपलीकडचे देखील बरेच काही आहे.” भारत हा मनापासून अनुभवता येतो कारण भारताने कोणताही प्रांत, धर्म, पंथ किंवा देशाची पर्वा न करता सर्वांचे खुल्या मनाने स्वागत केले आहे आणि जगातील सर्व भागांतून आलेल्या पर्यटकांचे स्वागत केले आहे.

रिव्हर क्रूझचा अनुभव अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की यात प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे. ते पुढे म्हणाले की, अध्यात्माचा शोध घेणाऱ्यांसाठी  काशी, बोधगया, विक्रमशिला, पटना साहिब आणि माजुली यांसारखी ठिकाणे आहेत, तर बहुराष्ट्रीय क्रूझचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना ढाका मार्गे बांगलादेशमध्ये  जाण्याची संधी मिळेल आणि भारतातील नैसर्गिक विविधता पाहू इच्छिणाऱ्या पर्यटकांना सुंदरबन आणि आसाममधल्या जंगलातून जाण्याची संधी मिळेल. क्रूझ २५ वेगवेगळ्या नदी  प्रवाहांमधून जाणार असल्याचे नमूद  करून पंतप्रधान म्हणाले की, ज्यांना भारतातील नदी व्यवस्था समजून घेण्यात रस आहे त्यांच्यासाठी ही  क्रूझ महत्त्वपूर्ण आहे. भारतातील नानाविध पाककला  आणि पाककृती जाणून घेण्याची  इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

“या क्रूझवर भारताचा वारसा आणि त्याच्या आधुनिकतेचा अनोखा  मिलाफ याचे दर्शन घडेल ” असे सांगत  पंतप्रधानांनी क्रूझ पर्यटनाच्या नवीन युगाकडे लक्ष वेधले , ज्यामध्ये  देशातील युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. “केवळ परदेशी पर्यटकच नाही तर अशा अनुभवासाठी विविध देशांमध्ये प्रवास केलेले भारतीय आता उत्तर भारतात याचा आनंद घेऊ शकतात,” असे पंतप्रधान म्हणाले. क्रूझ पर्यटनाचा खर्च  तसेच विलासी  अनुभव लक्षात घेऊन क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी देशातील अन्य अंतर्देशीय जलमार्गांवरही अशाच प्रकारचा  अनुभव देणारी सेवा नजीकच्या काळात सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वेगाने विकसित होत असलेल्या पर्यटनाबाबतच्या जागतिक चित्रासोबत भारताबद्दलची उत्सुकता देखील वाढत आहे, त्यामुळे देश आता पर्यटनाच्या एका मजबूत टप्प्यात प्रवेश करत आहे याचा देखील उल्लेख पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले की, याच कारणाने, गेल्या आठ वर्षांत देशातील पर्यटन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. श्रद्धास्थाने म्हणून प्रसिध्द असलेल्या स्थळांचा प्राधान्यक्रमाने विकास करण्यात आला आणि काशी हे या प्रयत्नांचे जिवंत उदाहरण आहे. सुधारित सोयीसुविधांची व्यवस्था आणि  काशी विश्वनाथ धाम तीर्थस्थळाचे पुनरुज्जीवन यामुळे काशीला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली दिसते आहे. यामुळे, तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेला फार मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. आधुनिकता, अध्यात्मिकता आणि विश्वास यांच्या संयोगातून उभारलेली नवी टेंट सिटी म्हणजेच नवे तंबूचे शहर, पर्यटकांना नाविन्यपूर्ण अनुभव मिळवून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की आजचा हा कार्यक्रम म्हणजे २०१४ नंतर देशामध्ये राबवण्यात आलेली धोरणे, निर्णय आणि कार्याची दिशा यांचे प्रतिबिंब आहे. “एकविसाव्या शतकातील हे दशक म्हणजे भारतातील पायाभूत सुविधांच्या बाबतीत परिवर्तनाचे दशक ठरले आहे. काही वर्षांपूर्वी कल्पनातीत भासणाऱ्या पायाभूत सुविधा भारतात प्रत्यक्षात आकाराला आलेल्या दिसत आहेत,” ते म्हणाले. घरे, शौचालये,रुग्णालये,वीजनिर्मिती, पाणीपुरवठा, स्वयंपाकाचा गॅस,शैक्षणिक संस्था यांसारख्या सामाजिक पायाभूत सुविधांपासून ते डिजिटल पायाभूत सुविधा तसेच रेल्वे,जलमार्ग, हवाई मार्ग तसेच रस्ते यांच्यासारख्या दळणवळणविषयक पायाभूत सुविधा हे सर्व भारताच्या वेगवान विकासाचे निदर्शक आहेत असे त्यांनी सांगितले. भारतात सर्वच क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम आणि महत्तम प्रगती दिसून येत आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

भारताच्या वाहतूक क्षेत्राला नदीमार्गाने प्रवास करण्याचा समृद्ध इतिहास लाभलेला असून देखील, वर्ष २०१४ पूर्व काळात अशा प्रकारच्या जलमार्गाचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करण्यात आला ही बाब अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, २०१४ च्या पश्चात काळात भारत स्वतःच्या प्राचीन सामर्थ्याचा उपयोग आधुनिक भारताच्या उभारणीसाठी करून घेत आहे. देशातील मोठ्या नद्यांच्या प्रवाहातील वाहतुकीसाठी जलमार्ग विकसित करण्याच्या उद्देशाने नवीन कायदा तयार करून तपशीलवार कृती योजना आखण्यात आली आहे. वर्ष २०१४ मध्ये देशात केवळ ५ राष्ट्रीय जलमार्ग अस्तित्वात होते तर आता देशात एकूण १११ राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्यात येत असून त्यापैकी दोन डझन जलमार्गांचे परिचालन सुरु देखील झाले आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. तसेच, आठ वर्षांपूर्वी नद्यांतील जलमार्गांच्या  वापरातून केवळ ३० लाख टन मालाची वाहतूक होत होती त्यात आता तीन पटींनी वाढ झाली आहे असे ते म्हणाले.

पूर्व भारताच्या विकासाच्या संकल्पनेकडे संभाषणाचा ओघ पुन्हा केंद्रित करत पंतप्रधान म्हणाले की आज सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे देशाच्या पूर्व भागाला विकसित भारताच्या उभारणीसाठीचे  विकास इंजिन म्हणून कार्यरत होण्यात मदत होईल. आज उद्घाटन झालेल्या उपक्रमामुळे हल्दिया बहुउद्देशीय टर्मिनल वाराणसीशी जोडले गेले आहे, तसेच ते भारत बांगलादेश प्रोटोकॉल मार्गाशी आणि ईशान्य भारताशी देखील जोडले गेले आहे. या नव्या सुविधेमुळे कोलकाता बंदर तसेच बांगलादेश यांना जोडणारा जलमार्ग देखील उपलब्ध झाला आहे. यातून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड तसेच पश्चिम बंगाल या भागातील व्यापाऱ्यांना बांगलादेशाशी व्यवसाय करणे सुलभ होणार आहे.

कर्मचारीवर्ग तसेच कुशल मनुष्यबळाच्या प्रशिक्षणाच्या आवश्यकतेवर भर देत पंतप्रधान मोदी यांनी गुवाहाटी येथे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, जहाजांच्या दुरुस्तीसाठी गुवाहाटी येथे नव्या केंद्राच्या उभारणीचे काम देखील सुरु आहे. “समुद पर्यटनासाठीचे किंवा मालवाहतूक करणारे असे कोणत्याही प्रकारचे जहाज असो, ही जहाजे केवळ वाहतूक आणि पर्यटनाला चालना देत नाहीत तर त्यांच्या सेवांशी संबंधित संपूर्ण उद्योगात नव्या संधींची निर्मिती देखील होत असते,” पंतप्रधान म्हणाले.

झालेल्या अभ्यासाचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले, की जलमार्ग केवळ पर्यावरणासाठी लाभदायक असतात इतकेच नव्हे तर पैशांची बचत करण्यासही ते सहाय्य करतात. ते पुढे म्हणाले, की जलमार्ग चालवण्याचा खर्च रस्त्यांच्या तुलनेत अडीच पट कमी आहे आणि रेल्वेच्या तुलनेत एक तृतीयांशाने कमी आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मालवाहतूक धोरणाचा (नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी) देखील उल्लेख केला आणि सांगितले की भारतात हजारो किलोमीटर्सचे जलमार्गाचे जाळे विकसित करण्याची क्षमता आहे. भारतामध्ये १२५ हून अधिक नद्या आणि जलप्रवाह आहेत ज्यांचा विकास करून तसेच बोटींमधून वस्तूंची आणि लोकांची ने-आण करण्यासाठी ते विकसित केले जाऊ शकतात यामुळे बंदर-मार्ग विकासाला आणखी चालना मिळू शकते, यावरही त्यांनी भर दिला.जलमार्गाचे आधुनिक बहुविध जाळे (मल्टी-मॉडल नेटवर्क) तयार करण्याच्या गरजेवर त्यांनी जोर दिला आणि ईशान्येकडील जल संपर्क मजबूत करणाऱ्या बांगलादेश आणि इतर देशांसोबतच्या सहभागाबाबतही माहिती दिली.

भाषणाच्या समारोपात, पंतप्रधानांनी भारतातील जलमार्ग विकसित करण्याच्या निरंतर विकास प्रक्रियेवर भाष्य केले आणि ते म्हणाले, “विकसित भारताच्या निर्मितीसाठी उत्तम दळणवळण सुविधा आवश्यक आहेत.”भारतातील नद्या जलशक्ती आणि देशाच्या व्यापार आणि पर्यटनाला नवी उंची देतील,असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त यावेळी केला आणि नौका पर्यटन(क्रूझ)करणाऱ्या सर्व प्रवाशांचा ‘प्रवास आनंददायी होवो,’अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा, केंद्रीय बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

एमव्ही गंगा विलास

एमव्ही गंगा विलास ही प्रवासी नौका उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून आपल्या प्रवासाचा आरंभ करेल आणि ५१ दिवसात सुमारे ३,२०० किमी प्रवास पूर्ण करत,भारत आणि बांगलादेशातील २७ नदी प्रवाह ओलांडत बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढला पोहोचेल. एमव्ही गंगा विलास मध्ये तीन डेक, १८ निवासी खोल्यांसह, ३६ पर्यटक एकावेळी नेण्याची  क्षमता असून त्यात सर्व आरामदायक सुविधा आहेत. या नौकेच्या संपूर्ण कालावधीच्या प्रवासासाठी स्वित्झर्लंडमधील ३२ पर्यटकांना पहिली संधी मिळाली आहे.

एमव्ही गंगा विलास क्रूझ ही देशातील सर्वोत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळे जगासमोर आणण्यासाठी तयार केली आहे. जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नद्यांवरील घाट तसेच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह ५० पर्यटन स्थळांना भेटी देत, ५१ दिवसांच्या नौका पर्यटनाचे नियोजन यात करण्यात आले आहे. या प्रवासामुळे पर्यटकांना भारत आणि बांगलादेशातील कला, संस्कृती, इतिहास आणि आध्यात्मिक आनंदात सहभागी होण्याची आणि प्रवासाचा  अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. रिव्हर क्रूझ पर्यटनाला चालना देण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, नदी पर्यटनांची अद्याप योग्य प्रकारे वापर न झालेली क्षमता ही सेवा सुरू झाल्याने वापरात येईल आणि ती भारतासाठी नदी क्रूझ पर्यटनाच्या नवीन युगाची सुरुवात करेल.

वाराणसी येथे टेंट सिटी

या प्रदेशातील पर्यटनाच्या संभाव्य संधींचा फायदा घेण्यासाठी गंगा नदीच्या काठावर टेंट सिटीची संकल्पना मांडण्यात आली आहे. हा प्रकल्प शहरातील घाटांच्या समोर विकसित करण्यात आला आहे जो निवास सुविधा प्रदान करेल आणि विशेषत:काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनानंतर, वाराणसीमध्ये वाढलेल्या पर्यटकांच्या मागणीची पूर्तता करेल, ही टेन्ट सिटी वाराणसी विकास प्राधिकरणाने पीपीपी (सार्वजनिक खाजगी भागीदारी) च्या माध्यमातून विकसित केली आहे. परिसरातील विविध घाटांवरून बोटीने पर्यटक टेंट सिटीमध्ये पोहोचतील. दरवर्षी ऑक्‍टोबर ते जून या कालावधीत टेंट सिटी कार्यान्वित होणार असून पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने तीन महिन्यांसाठी ती तात्पुरती काढून टाकली जाईल.

अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्प

पंतप्रधान पश्चिम बंगालमधील हल्दिया मल्टी-मोडल टर्मिनलचे उद्घाटन करतील. जलमार्ग विकास प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या, हल्दिया मल्टी-मोडल टर्मिनलची मालवाहतूक क्षमता सुमारे ३ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष (MMTPA) आहे आणि बर्थ सुमारे ३००० डेडवेट टनेज (DWT) पर्यंत जहाजे हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

पंतप्रधानांनी गाझीपूर जिल्ह्यातील सैदपूर, चोचकपूर, झामानिया आणि उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील कानसपूर येथे चार तरंगत्या कम्युनिटी जेटींचे उद्घाटन केले. याशिवाय, पंतप्रधानांनी दिघा, नक्त दियारा, बारह, पाटणा जिल्ह्यातील पानापूर आणि बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर येथे पाच कम्युनिटी जेटींची पायाभरणी केली. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये गंगा नदीच्या काठावर ६० हून अधिक सामुदायिक (कम्युनिटी)जेटी बांधल्या जात आहेत ज्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक समुदायांचे जीवनमान सुधारेल. या सामुदायिक जेटी, लहान शेतकरी, मत्स्यपालन करणारे घटक, असंघटित शेत-उत्पादक घटक,

बागायतदार, फुलविक्रेते आणि गंगा नदीच्या आसपासच्या भागात आर्थिक विकसाशी निगडित व्यवसायावर लक्ष केंद्रित करणाऱ्यांना साधे वाहतुकीचे पर्याय प्रदान करून लोकांचे जीवनमान सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. पंतप्रधानांनी गुवाहाटी येथे ईशान्येसाठी सागरी कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटनही केले. हे केंद्र ईशान्येकडील प्रदेशातील समृद्ध प्रतिभासंचय वाढवण्यास मदत करेल आणि वाढत्या लॉजिस्टिक उद्योगात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देईल.

या व्यतिरिक्त, पंतप्रधानांनी गुवाहाटी येथील पांडू टर्मिनल येथे जहाज दुरुस्ती सुविधा आणि उन्नत रस्त्याची पायाभरणी केली. पांडू टर्मिनलवरील जहाज दुरुस्ती सुविधेमुळे मौल्यवान अशा वेळेची बचत होईल कारण जहाजाला कोलकाता येथील दुरुस्ती सुविधेपर्यंत नेण्यासाठी आणि परत जाण्यासाठी एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. याशिवाय, या सुविधेमुळे पैशांच्या बाबतीतही मोठी बचत होणार असल्याने जहाजाचा वाहतूक खर्चही वाचणार आहे. पांडू टर्मिनलला राष्ट्रीय महामार्ग एनएच २७(NH २७) ला जोडणारा कायमस्वरूपी रस्ता २४ तास कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *