Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“लढाई अजून संपलेली नाही. कोरोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे”

पुण्यातील कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणेतील समन्वय महत्त्वाचा; मृत्यूदर रोखण्यासोबतच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे, दि. ३०: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगतानाच क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसोबतच प्रत्येकाने झोकून देत काम केले तर पुणे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या, जम्बो रुग्णालयांच्या उभारणीनंतर व समन्वयातून यामध्ये सुसूत्रता आणण्यात यश आले आहे. पुण्यातही लवकरात लवकर जम्बो रुग्णालयांची उभारणी करावी, जम्बो रुग्णालयांच्या सुविधा निर्माण झाल्यानंतर रुग्णांची बेडसाठी होणारी गैरसोय टळेल. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. मात्र, लढाई अजून संपलेली नाही. कोरोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे. ते कमी झाले पाहिजे तसेच कोरोना चाचण्यांचे अहवाल यायला विलंब होत आहे, ही गंभीर बाब आहे, अहवाल वेळेत प्राप्त होतील, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी हे प्रशासनाचा कणा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांनी जागरुकपणे व जबाबदारीने काम करावे तसेच प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याने आपल्या प्रभागात कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, नागरिकांच्या मनात भीती आहे, ही भीती दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती करावी, तसेच प्रतिबंधित क्षेत्रात बंधने पाळली जातील व नियमांची अत्यंत काटेकार अंमलबजावणी होईल, याबाबत दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे, या कामांत अजिबात ढिलाई नको, असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निधीची कमतरता भासू दिली नाही, यापुढेही निधीची कमतरता भासणार नाही. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागात नियंत्रण मिळवा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत काम करा, गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांना सोबत घेत पुण्याला कोरोनामुक्त करूया, असा आशावाद व्यक्त करतानाच येत्या काही  दिवसात आपण सर्व मिळून कोरोनावर निश्चितपणे मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोना व पावसाळ्यातील साथीचे आजार यांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून काम करावे तसेच पावसाचे पुढील काही महिने सर्वांसाठी आव्हानाचे आहेत. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. कोरोनाबाबत चाचण्या, संपर्क शोधणे, बेड व रुणवाहिका व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती,  कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या,  बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा आदि विषयी तसेच इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त गणेश सोनोने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी वॉर्डनिहाय कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *