वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम विनय भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी झाली निर्दोष मुक्तता
पुणे, दि. १०: बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याशी (युएपीए) संबंधित प्रकरणांसाठीच्या पुणे येथील विशेष न्यायालयाने आज डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी, सचिन प्रकाशराव अंदुरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर या आरोपींना दोषी ठरवले, आणि त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावत जन्मठेपेची शिक्षा दिली. न्यायालयाने त्यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक ०९/०५/२०१४ च्या आदेशानुसार सीबीआयने पुणे शहरातील डेक्कन पोलीस ठाण्यात यापूर्वी नोंदवलेल्या प्रकरणाचा तपास हाती घेऊन तात्काळ गुन्हा नोंदवला होता. यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर, ऑगस्ट २०१३ मध्ये पुणे येथील ओंकारेश्वर पुलावर सकाळी फिरायला गेले असताना दोन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासानंतर सीबीआयने ०६/०९/२०१६ रोजी पुणे येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर, सीबीआयद्वारे १३/०२/२०१९ आणि २०/११/२०१९ रोजी पुरवणी आरोपपत्रे दाखल करण्यात आली.
सचिन प्रकाशराव अंदुरे, शरद भाऊसाहेब कळसकर, वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम विनय भावे आणि संजीव पुनाळेकर या आरोपींविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पुणे येथील विशेष न्यायालयात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर सुनावणी करण्यात आली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील युएपीए प्रकरणांशी संबंधित विशेष न्यायालयाने आज दि. १०/०५/२०२४ रोजी दिलेल्या निकालाद्वारे आरोपी सचिन प्रकाशराव अंदुरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर यांना दोषी ठरवले आणि त्यानुसार त्यांना शिक्षा सुनावली. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम विनय भावे आणि संजीव पुनाळेकर यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.