Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे – नाशिक शहर आणि परिसर

नाशिक

नाशिक परिचय: नाशिक हे द्राक्ष आणि त्यापासून बनवल्या जाणाऱ्या मद्य(वाईन)च्या भरघोस उत्पादनामुळे भारताची ‘मद्याची राजधानी’ म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. हे शहर मुंबईपासून १८० किमी दूर आणि पुण्यापासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे.नाशिकच्या पूर्वेला सातवाहन राजवंशाची राजधानी होती. त्यानंतर १६ व्या शतकात, हे शहर मुगल शासनाखाली आले व त्याला गुलशनाबाद असे म्हटले जाते होते. यानंतर हे शहर पेश्व्यांजवळ होते व १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटीशांना त्यांनी ते गमावले होते. वीर सावरकरांसारखे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक नाशिकचे होते. असे म्हटले जाते की १४ वर्षांच्या वनवासाच्या काळात, भगवान श्रीरामांनी नाशिकजवळील तपोवन नावाच्या एका स्थानावर वास्तव्य केले होते. याच ठिकाणावर, भगवान लक्ष्मणाने शूर्पनखा चे नाक कापले होते आणि म्हणून या ठिकाणाचे नाव नाशिक असे पडले. कालिदास, वाल्मिकी यांनी देखील त्यांच्या कृतींमध्ये नाशिकची चर्चा केली आहे. इ.स. १५० मध्ये प्रसिद्ध तत्त्वज्ञ, प्लॉटिमी यांनी पण नाशिकचा उल्लेख केला होता. नाशिक जिल्हा हा तापी व गोदावरीच्या खोर्‍यात उत्तर महाराष्ट्रात वसला आहे. जिल्ह्याचा बराचसा भाग डोंगररांगानी व्यापला असून या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन या भागात विविध कालावधींत सुमारे ३८ डोंगरी किल्ले उभारण्यात आले.
गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी याच जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरजवळ उगम पावून पूर्वेकडे वाहत जाते. मोसम, गिरणा, पांझरा, कादवा, बाणगंगा, दारणा ह्या जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. नाशिकमध्ये वाहणार्‍या जवळजवळ सर्व नद्या जिल्ह्यातच उगम पावतात हे एक आगळेवेगळे वैशिष्ट्‌य म्हणावे लागेल. गोदावरी नदीवरील गंगापूर धरण, गिरणा नदीवरील चणकापूर व नांदगाव धरण तर दारणा नदीवरील दारणा धरण हे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प आहेत. गोदावरीवरील गंगापूर हे देशातील पहिले मातीचे धरण होय. जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे २०% क्षेत्रावर वने आहेत. जिल्ह्यातील जंगल क्षेत्र प्रामुख्याने पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात म्हणजेच सुरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी व बागलाण या तालुक्यांमध्ये एकवटलेले आहे. साग हा वृक्ष प्रामुख्याने या वनांत आढळतो. याशिवाय ऐन, बांबू, शिसव, खैर, जांभूळ, मोह इत्यादी वृक्षही वनांत आढळतात. तौला, सप्तशृंगी व साल्हेर ही जिल्ह्यातील उंच शिखरे असून साल्हेर हे थंड हवेचे ठिकाण राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे उंच शिखर आहे. नाशिक सध्या महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, औद्योगिक व इतर अनेक पैलूत नाशिकने बराच विकास केला आहे.

पर्यटन स्थळे:

मुक्तिधाम मंदिर
मुक्तिधाम मंदिर हे नाशिक शहरापासून सुमारे ८ किमी अंतरावर एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर सुंदर शुध्द पांढऱ्या स्वरूपात बांधले आहे. पवित्र मंदिराची रचना वेगळी व अपरंपरागत आहे. मंदीराच्या भिंतीवर भगवद गीतेचे १८ अध्याय आहेत. हे मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांची एक प्रत आहे.

काळाराम मंदीर
काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन १७८२ मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते.सदर मंदीराचे बांधकामासाठी २000 कारागिर १२ वर्ष राबत होते.पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.२४५ फुट लांब व १४५ फुट रुंद मंदिर परिसराला १७ फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील २ फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.

रामकुंड
रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे.
वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच “अस्थिविलय तीर्थ” आहे. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी १६९६ मध्ये केले. श्री श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात.महात्मा गांधी,पंडीत नेहरु,इंदिरा गांधी,यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.

पंचवटी
नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. काळाराम मंदीरा जवळ वटवृक्षांचा समुह असुन हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘पंचवटी’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो.
काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदीर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे पंचवटी व सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. या मंदिरांमुळेच नाशिकला “पश्चिम भारताची काशी” असे म्हटले जाते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *