Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पारलिंगींच्या मतदान ओळखपत्रासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आश्वासन

“मिशन गौरी” डॉक्युमेंट्रीने दिल्या नव्या संवेदना

नांदेड, दि. १८: पारलिंगींना(ट्रान्सजेंडर) मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग युद्धपातळीवर मतदान ओळखपत्र पोहचवत आहे. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी, साक्षरतेसाठी लोककला, लोकसाहित्य, विविध सांस्कृतिक महोत्सव यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. अलिकडच्या काळात साहित्य संमेलनापासून  ते विविध जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित होत असलेल्या सांस्कृतिक कला महोत्सवात लोकशाही, मतदान जागृती या महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन केले जात आहे. अशा उपक्रमातूनच वरचेवर लोकशाही अधिक प्रगल्भ व भक्कम होत जाईल, असा विश्वास अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला.

नांदेड येथे तीन दिवसीय सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पारलिंगी(ट्रान्सजेंडर) समुदायाचे सलमा खान, गौरी सावंत, दिशा पिंकी शेख, शमीबा पाटील, राणी ढवळे, गुरू अहमद बकस आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

या सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाच्या सांगता समारोपासाठी संयोजक डॉ. सान्वी जेठवाणी यांनी अतिशय कल्पकतेने मतदार जागृती व पारलिंगी मतदार जनजागृतीच्या उद्देशाने भर देऊन या महोत्सवाला जबाबदारीचे भान दिल्याचे गौरोद्गार देशपांडे यांनी काढले. आपल्या न्याय हक्कासाठी संघर्षाची पार्श्वभूमी आपल्याला त्या हक्काची व कर्तव्याची जाणिव करून देते. तुम्ही सर्व पारलिंगी आपल्या अधिकारासाठी कायद्याच्या दृष्टिनेही सतर्क आहात याचे मला कौतूक वाटते. पारलिंगींमध्ये एक विधायक रचनात्मकता दडलेली आहे. तुमच्या अस्तित्वाचा स्विकार हा लोकशाहीचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

पारलिंगींच्या विविध शासकीय योजनांचे लाभ विनासायास व तात्काळ मिळाले पाहिजे. एक नागरिक म्हणून प्रत्येकाला मतदानाचा जो अधिकार मिळालेला आहे तो पारलिंगींना बजावता यावा यासाठी आम्ही युद्धपातळीवर मतदान ओळखपत्र पोहचवित आहोत. अनेक पारलिंगींजवळ ओळखपत्र/आधार नसल्याने त्यांची गैरसोय होते. शासनाने ही बाब अतिशय गांभीर्याने घेऊन त्यांना ज्या सुविधा देता येतात त्या सर्व लाभ सामाजिक न्याय विभागाकडून पोहोचविले जात आहेत. यापुढे त्यांच्या हक्काचे मतदान कार्ड प्रत्येक पारलिंगींना मिळावेत यादृष्टीने स्वयंघोषणापत्राच्या आधारावर मतदानाचा अधिकार पोहोचविण्याचा प्रयत्न करून असे सुतोवाचही देशपांडे यांनी केले. यावेळी कुलगुरू डॉ. भोसले, जिल्हाधिकारी राऊत यांनी मार्गदर्शन केले. तर पुरस्काराने सन्मानित पारलिंगींनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी परलिंगींना अस्मिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात किन्नरमा ट्रस्टच्या अध्यक्षा सलमा खान, श्रीगौरी सावंत, दिशा पिंकी शेख, शमीभा पाटील, राणी ढवळे, मयुरी आळवेकर, रंजिता बकस, कादंबरी, गौरी बकस, फरिदा बकस, जया, अर्चना, बिजली, समाजसेवक अमरदीप गोधने यांचा सन्मान करण्यात आला. या समारोप समारंभात स्कॉच अवार्ड सन्मानित सेजल हिचा विशेष सन्मान करण्यात आला.

पारलिंगींवरील मिशन गौरी डॉक्युमेंट्रीने दिल्या नव्या संवेदना

या महोत्सवाच्या निमित्ताने विशेषत: पारलिंगी मतदान व अधिकार साक्षरतेच्यादृष्टिने जिल्हाधिकारी राऊत यांनी याला वेगळी जोड दिली. त्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्यासमवेत त्यांच्यासाठीच्या ज्या शासकीय योजना आहेत याबाबत विचारमंथन व्हावे यावर भर देण्याबाबत संयोजकांना सूचित केले होते. त्यानुसार युवा मतदार साक्षरतेसह पारलिंगींना माणूस म्हणून जगण्याचा असलेला हक्क व त्यांच्या भावभावनांवर आधारीत “मिशन गौरी” ही डॉक्युमेंट्री समारोप समारंभात आवर्जून दाखविण्यात आली. पारलिंगींना विकास व सामाजिक समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सेतू केंद्र देण्याच्या उपक्रमावर व त्यांना मतदान ओळखपत्रासह रेशनकार्ड व इतर विकास उपक्रमांवर आधारीत ही डाक्युमेंट्री नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आली. याचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *