Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ठाकरे नावाचा ब्रँड सुरू करणारे प्रबोधनकार ठाकरे जयंती विशेष लेख

आज प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती..

पत्रकारिता, ग्रंथ लेखन, वक्तृत्व, इतिहास संशोधन व प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन साधणारे श्रेष्ठ प्रबोधनकार !

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे लोकहितवादी, आगरकर व महात्मा फुले यांच्या समाजसुधारणांना पुढे नेणारे द्रष्टे समाजसुधारक होत. त्यांचे जीवन म्हणजे अन्यायांविरुद्धचा जणू एक संग्रामच होता.

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाज सुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी सार्‍यांची दाणादाण उडवून दिली.

सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजार्‍यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक अमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी त्या सर्वांना दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्त्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.

समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खर्‍या ब्राह्मणांची भूमिका मांडली.

त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वत: सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.

मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. आजच्या काळात हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी सहज वाटतात, या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. त्या काळच्या कर्मठ वातावरणात समाजसुधारणांचा केवळ उच्चार करणेही अवघड होते. आजही हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत, पण हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचा समूळ नाश झालेला नाही. स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी! यावरून प्रबोधनकारांचे द्रष्टेपण सिद्ध होते.

प्रबोधनकार हे एक झपाटलेले लेखक होते. ते सचोटीचे पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांचे सर्व लेखन हे विशिष्ट ध्येयाच्या प्रचारासाठीच होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणात्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापुजी, पंडिता रमाबाई व माझी जीवनगाथा(आत्मचरित्र) ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राम्हण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्ह्मणांनी न्यायालयाकडे केली असता न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त आचार्य अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते. शिवसेना या संघटनेच्या स्थापनेचे बीज हे प्रबोधनकारांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये आहे असे मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते. आजच्या शिवसेना या संघटनेचं नाव देखील त्यांनीच सुचवलं होतं. त्यांचा विचार त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी आजपर्यंत जपला आहे.

या थोर अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आज त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *