Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि शंका व्यक्त करण्याची सवय लावण्याचे राष्ट्रपती मुर्मू यांचे शिक्षकांना आवाहन

राष्ट्रपतींच्या हस्ते शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्‍ली, दि. ५ : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (५ सप्टेंबर २०२२) विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे, शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, देशभरातील ४५ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी आपल्या शिक्षकांचे स्मरण करत सांगितले की त्यांनी आपल्याला केवळ शिकवले नाही तर प्रेम आणि प्रेरणा देखील दिली. कुटुंब आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावरच त्या महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या आपल्या गावातील पहिली मुलगी ठरल्या. त्यांनी सांगितले की, आयुष्यात जे काही मिळवले त्याबद्दल आपण नेहमीच आपल्या शिक्षकांच्या ऋणी आहोत.

आजच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष हे विकासाचा आधार ठरेल आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. या क्षेत्रांमध्ये भारताचे स्थान आणखी मजबूत करण्याचा पाया, शालेय शिक्षणाच्या माध्यमातून बांधला जाऊ शकतो. मातृभाषेतून विज्ञान, साहित्य किंवा सामाजिक शास्त्राच्या अभ्यासामुळेच नैसर्गिक प्रतिभेचा विकास अधिक प्रभावीपणे होऊ शकतो, असे आपले मत असल्याचे त्या म्हणाल्या. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात आपली आईच आपल्याला जगण्याची कला शिकवते. म्हणूनच नैसर्गिक प्रतिभा विकसित करण्यासाठी मातृभाषा जास्त उपयुक्त ठरते. आईनंतर शिक्षकांनी दिलेले शिक्षण आपल्याला जीवनात पुढे नेत असते. शिक्षकांनीही मातृभाषेतून शिकवले तर विद्यार्थी त्यांच्या कलागुणांचा सहज विकास करू शकतात. म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांच्या वापरावर अधिक भर देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे, असे मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केले. चांगले शिक्षक निसर्गात अस्तित्त्वात असलेल्या जिवंत उदाहरणांच्या मदतीने क्लिष्ट तत्त्वे सहज समजावून सांगू शकतात. त्यांनी शिक्षकांबद्दल एक प्रसिद्ध म्हण उद्धृत केली, ती अशी “सामान्य शिक्षक सांगतात; चांगले शिक्षक स्पष्ट करतात; उत्तम शिक्षक दाखवतात; आणि महान शिक्षक प्रेरणा देतात.” त्या म्हणाल्या की, आदर्श शिक्षकांमध्ये हे चारही गुण असतात. असे आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन घडवून खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवतात.

विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची आणि शंका व्यक्त करण्याची सवय लावावी, असे आवाहन राष्ट्रपतींनी शिक्षकांना केले. विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे देऊन सर्व शंकांचे निरसन केल्यास त्यांच्या ज्ञानातही भर पडेल. एक चांगला शिक्षक नेहमी काहीतरी नवीन शिकण्यासाठी उत्साही असतो, असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *