दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार निकाल
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार दि. ८ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी ही माहिती दिली.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल विविध अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या आसन क्रमांकाच्या माध्यमातून विषयनिहाय गुण पाहता येणार असून निकालाची प्रत देखील डाउनलोड किंवा प्रिंट करून घेता येणार आहे.
यंदा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी विविध संकेतस्थळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये डिजीलॉकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, विविध शैक्षणिक संकेतस्थळे तसेच वृत्तसंस्थांच्या संकेतस्थळांचा समावेश आहे. निकाल प्रसिद्ध होताच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना डिजीलॉकर अॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात प्रवेश प्रक्रिया किंवा इतर शैक्षणिक कारणांसाठी डिजिटल स्वरूपातील गुणपत्रिकेचा उपयोग करता येणार आहे.
तसेच संबंधित शाळांनाही त्यांच्या शाळेचा एकत्रित निकाल ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळांना शाळा लॉगिनद्वारे विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती पाहता येईल.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा संबंधित शाळांमार्फत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार असून त्यासाठी आवश्यक अटी, शर्ती आणि सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
यंदाच्या दहावी परीक्षेस राज्यभरातून लाखो विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया, अकरावी प्रवेश आणि विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होणार असल्याने निकालाकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांचे विशेष लक्ष लागले आहे.
