अध्यापकांना संवेदनशील आणि सक्षम बनविण्यावर भर
मुंबई, दि. ७ : विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी तसेच अध्यापकांना अधिक संवेदनशील, सजग आणि सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘मानससूत्र – विद्यार्थी मानसिक आरोग्य व कल्याण’ या तीन दिवसीय अध्यापक विकास कार्यक्रमाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुणे येथे आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, बदलत्या आणि स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण वाढत असून त्यांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. शैक्षणिक दडपणाबरोबरच सामाजिक अपेक्षा, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, भावनिक एकाकीपणा आणि करिअरविषयक अनिश्चितता यांसारख्या अनेक समस्यांना विद्यार्थी सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांनी केवळ ज्ञानदाते न राहता विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि भावनिक आधार बनण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘मानससूत्र’ हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून अध्यापकांच्या संवेदनशीलतेला नवी दिशा देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणारा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमधील मानसिक तणावाची लक्षणे ओळखणे, नैराश्य किंवा आत्महत्येच्या प्रवृत्तीची प्रारंभिक चिन्हे समजून घेणे, योग्य समुपदेशन आणि संवाद साधणे तसेच आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडे संदर्भित करण्यासाठी सक्षम यंत्रणा विकसित करणे या विषयांवर प्रशिक्षणात सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संकटपरिस्थितीत विद्यार्थ्यांना तातडीने आणि संवेदनशील प्रतिसाद देण्यासाठी अध्यापकांना सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मानसिक आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्वास्थ्याबाबत सजगता वाढण्यास या उपक्रमामुळे मोठी मदत होईल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धती अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून मानसिक आरोग्य हा त्यातील महत्त्वाचा घटक बनत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबर मानसिक स्थैर्य आणि भावनिक सक्षमता आवश्यक असल्याचे मतही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
