Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“प्रत्येकाचा आपला श्रावण मात्र वेगळाच असतो….” वाचा आणि ठरवा हा श्रावण ऋतू कसा घालवायचा ते

“प्रत्येकाचा आपला श्रावण मात्र वेगळाच असतो….” वाचा आणि ठरवा हा श्रावण ऋतू कसा घालवायचा ते..

श्रावण….

बेभान कोसळणारा सगळीकडे वाहून धुऊन काढणारा, जमिनीला तृप्त करणारा पाऊस थोडा थकतो आणि थोडासा थांबत कधी जोरदार असा बरसू लागतो ना तेव्हा श्रावण लागला असे समजावे जणू काही प्रेयसी हो म्हणे पर्यंत रोज चकरा मारणार प्रियकर प्रेयसी ने हो म्हटल्या नंतर थोडासा निवांत होतो ना अगदी तसाच….

श्रावण म्हटले की काहींना चाहूल लागते सणावारांची तर काहींना चाहूल लागते यावर्षी फिरायला कुठे जायचे याचे कोणता घाट, कोणता डोंगर पालथा घालायचा कोणती दरी धुंढाळायची याची. निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी आपल्या पूर्वजांनी यात्रा आणि सहल यांची मस्त सांगड घातली आहे. शौर्य , रौद्रपण यापुढे नतमस्तक होता यावे म्हणुन सर्व शूर अश्या देव्या डोंगरावर वसलेल्या तर गूढता , लीनता समजावी म्हणुन भोळा शंकर दऱ्याखोऱ्यांमध्ये विराजमान.
श्रवणातल्या सहली म्हणजे एक अजबच रसायन असते कधी पाऊस इतका बरसतो की धडकी भरावी केव्हा इतका हळुवार की फक्त तरलभाव जागृत व्हावे… आणि एका वेगळ्याच जगात जावे .
मस्त रिमझिम पाऊस घाटातली हिरवीगार वाट.. आणि हातात हात.. मधेच येणारं इंद्रधनुष्य… वा इथेच थांबावे ना सारे जग…..

फेसाळत कोसळणारा धबधबा त्याखाली मनसोक्त भिजणं आणि त्या भिजलेपणत हाती आलेल गरमागरम मक्याचं कणीस म्हणजेच आजच्या भाषेत भुट्टा, त्यावर लावलेलं लिंबु मीठ म्हणजे तर स्वर्गच … या पद्धतीच खाणं इतर वेळी का मजा देत नसेल बरं!!!!
तोच पाऊस घरातही विविध अंगांनी भावतो. बाहेर कोसळणारा धुवाँधार पाऊस आपण चहाच कप हाती घेऊन खिडकीतुन बाहेर पाहत अंगावर तुषार झेलत बसलो आहे आणि कानी शब्द आले “रिमझिम गिरे सावन” हरवतो ना आपण आपल्याच भाव विश्वात… आपल्याही नकळत ते गुणगुणू लागतो.. आणि अशाच एखाद्या आठवणीत रमतो आणि छानसं हसू चेहऱ्यावर येतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा दिवस असतोच असतो.

असाच एखादा खिडकीत बसून पाऊस पहात “मेरे नयना सावन भादो” ऐकत असेल त्याच्या साठी हाच श्रावण किती त्रासदायक असेल ना…
एखादा चार्ली सारखा, पावसात यासाठी मनसोक्त भिजत असेल कि त्याचे अश्रू कुणी बघू नये. कुणाला तरी आठवत ,मनातले दुःख लपवत तो फिरत असेल त्याला तर तो श्रावणाच्या पाऊस सखा सोबती वाटत असेल…..
मनाच्या अश्या किती भाव भावनांना वाट करून देतो हा श्रावण…

पाऊस सुरु झाला तो म्हणतो चल जाऊया… पावसात भिजणार आहे माहित असुनही ती छान तयार होते. त्याच्या मागे दुचाकी वर कमरेभोवती हात हाताचा विळखा घालून, सोबतीचा आनंद लुटत आयुष्यभरासाठी आठवणी गोळा करत हे दोघे फिरतात तेव्हा त्यांनाही ठाऊक नसते की या आठवणी त्यांचे पुढचे कितीतरी श्रावण रोमांचित करणार आहेत.


कोपऱ्यावरची रस्त्याच्या कडेला असलेली चहाची टपरी .. खाल्ल्यानंतर त्रास होणार हे माहित असूनही मित्र मैत्रिणीसोबत पावसात उभे राहून गप्पा करत खाल्लेली भजी आणि सोबत चहा याची मजा काही औरच.
असा हा श्रावण प्रत्येकाला वेगळा दिसतो वेगळा भासतो आणि वेगळा कळतो प्रत्येकाला काहींना काही देतो कुणाला पुण्य तर कुणाला कायमच्या आठवणी …
प्रत्येकाचा आपला श्रावण मात्र वेगळाच असतो….

– रेडिओ निवेदिका दिपाली माळी

 

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *