Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सावरकर मंत्रालयावरील पायरीवर ‘मला भारतरत्न द्या हो’ असे सांगण्यासाठी उभे नाहीत; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

सावरकर मंत्रालयावरील पायरीवर ‘मला भारतरत्न द्या हो’ असे सांगण्यासाठी उभे नाहीत; शिवसेनेचा भाजपवर निशाणा

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करू असे म्हटले आहे. यावरून गेले चार दिवस अखंड देशभरच टीका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी वादग्रस्त कम्युनिस्ट नेता कन्हैया कुमारनेही वादग्रस्त वक्तव्य केले होते.

आज भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने सामना या आपल्या मुखपत्रातून भाजपचे कान टोचले आहेत. यात शिवसेना म्हणते की “ज्यांना चिदंबरम हे वीरपुरुष वाटतात त्यांना सावरकर हे क्रांतिकारक कसे वाटणार? आम्हाला काँग्रेसच्या भूमिकेचे दुःख नाही. ते तसेच वागणार, पण सावरकरांच्या ‘भारतरत्न’साठी शिफारस करू असे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात द्यायचे? हे बरोबर नाही. सावरकर हे जगभरातील क्रांतिकारकांचे ‘नायक’ होते. ते तसेच राहतील. त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे ही देशाची इच्छा आहे. तो देशाचा बहुमान ठरेल.”

पुढे यात वीर सावरकरांना भारतरत्न गेल्या ५ वर्षातच मिळायला हवा होता असेही नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचे खासदार वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा यासाठी सातत्याने लोकसभेत व राज्यसभेत मागणी करताना दिसत आहेत. पण अचानक भाजपने हा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात टाकून सदर मुद्दा शिवसेनेकडून हायजॅक करण्याचाच प्रयत्न केला आहे. ज्यामुळे शिवसेना खट्टू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सविस्तर अग्रलेख पुढीलप्रमाणे

महाराष्ट्रात ‘युती’चे सरकार येणारच आहे. आम्ही वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करू त्यासाठी भाजपला मतदान करा असे भाजपच्या जाहीरनाम्यात सांगितले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात असा संदर्भ येणे हे क्लेशदायक आहे. गेल्या पाच वर्षांत वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवान्वित करायलाच हवे होते. सरकार आपलेच होते. सावरकर हे सशस्त्र क्रांतिकारकांचे महानायक होते. पण आपल्या देशातील एक वर्ग महात्मा गांधींना खलनायक ठरवत आहे, तर दुसरा वर्ग सावरकरांना खलनायक ठरवत आहे. हे कधीतरी थांबायला हवे. भाजप त्यांच्या जाहीरनाम्यात म्हणते, सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही विचारतो, सावरकरांवर इतके वाईट दिवस आले आहेत काय, की त्यांना शिफारसीची गरज पडावी? सावरकरांना स्वातंत्र्यवीर मानायला काँग्रेस व त्यांचे बगलबच्चे तयार नाहीत. मग पी. चिदंबरम, रॉबर्ट वढेरा वगैरेंना स्वातंत्र्यवीर मानायचे काय? सावरकरांना दोन जन्मठेपांची सजा ब्रिटिश न्यायालयाने सुनावली. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून सावरकरांनी अंदमानात ज्या यातना भोगल्या त्या इतर कोणी भोगल्या असतील तर तसे सांगावे. सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर हेसुद्धा स्वातंत्र्यासाठी त्याच अंदमानात होते. पण दोन भावांना चार वर्षे माहीतच नव्हते की आपला भाऊसुद्धा याच तुरुंगात आहे. काय हा कठोर तुरुंगवास! सावरकरांची संपत्ती ब्रिटिशांनीचार वेळा जप्त केली. त्यांचे साहित्य, लिखाण जप्त केले. काही अटी, शर्ती मान्य करून सावरकर हे अंदमानातून सुटल्यावरही त्यांच्यावर समाजात वावरण्यासाठी कठोर बंधने घालण्यात आली. अशा सावरकरांना अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भारतरत्न मिळायला हवे होते. ते झाले नाही तर निदान मोदी यांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या कार्यकाळात तरी ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करायला काय हरकत होती? तेही झालेले नाही. आता भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, “आम्ही सावरकरांची शिफारस करू!’’ हा सावरकरांचा अपमान आहे, असे अनेकांचे सांगणे आहे. सावरकरांवर प्रेम करणाऱ्या कोटय़वधी जनतेच्या श्रद्धेला त्यामुळे नक्कीच ठेच लागली आहे. सावरकर मंत्रालयाच्या पायरीवर ‘मला भारतरत्न द्या हो’ असे सांगण्यासाठी उभे नाहीत. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम केला त्यांना ‘भारतरत्न’चे काय अप्रूप! सावरकरांनी त्यांच्या हयातीत राष्ट्रभक्तिपर, स्वातंत्र्य देवतेस वंदन करणारी अनेक नाटके लिहिली. पण सावरकरांच्या ‘भारतरत्न’वरून जे नाटक सध्या रंगवले जात आहे ते असह्य आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काल मुंबईत येऊन गेले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “वीर सावरकरांविषयी आम्हाला आदर आहे. त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीविषयी मतभेद असू शकतात. पण ते महान स्वातंत्र्यसेनानी होते. म्हणूनच इंदिरा गांधींनी त्यांच्यावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन केले.’’ मनमोहन सिंग यांची

भूमिका संयमी

आहे. पण सावरकर यांना पळपुटे माफीवीर म्हणणाऱ्या ‘बँकॉक’फेम राहुल गांधींचे काय? त्यांच्या डोक्यातले सडके कांदे कसे निघणार? राहुल गांधी सध्याच्या युगातील पहिल्या क्रमांकाचे पळपुटे आहेत. काँग्रेसला वाऱ्यावर सोडून ते पळून गेले. ते बँकॉकच्या एकांतवासात गेले आणि वीर सावरकर हे ‘अंदमानात’ चार वर्षे देशाच्या स्वातंत्र्यासाठी कठोर एकांतवास भोगत होते. हा फरक आहे. काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम हे आर्थिक अफरातफरीच्या, देशलुटीच्या गुह्यात तुरुंगात आहेत. राहुल गांधी व त्यांच्या मातोश्रींना चिदंबरमविषयी कळवळा आहे. चिदंबरम यांच्यावर अन्याय होत आहे असे हे महाशय म्हणतात. सोनिया गांधी चिदंबरम यांना तिहार तुरुंगात जाऊन भेटतात. चिदंबरम यांना तुरुंगात घरचे जेवण, झोपायला गादी, टीव्ही, पंखा, इंग्लिश कमोड अशा राजेशाही सुविधा मिळाल्या आहेत. वीर सावरकरांना नीट पाय लांब करूनही पडता येत नव्हते इतकी ती काळकोठडी लहान होती. ज्यांना चिदंबरम हे वीरपुरुष वाटतात त्यांना सावरकर हे क्रांतिकारक कसे वाटणार? आम्हाला काँग्रेसच्या भूमिकेचे दुःख नाही. ते तसेच वागणार, पण सावरकरांच्या ‘भारतरत्न’साठी शिफारस करू असे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात द्यायचे? हे बरोबर नाही. सावरकर हे जगभरातील क्रांतिकारकांचे ‘नायक’ होते. ते तसेच राहतील. त्यांना ‘भारतरत्न’ द्यावे ही देशाची इच्छा आहे. तो देशाचा बहुमान ठरेल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *