Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गोव्याच्या चौकीदाराची जबाबदारी पर्रीकरांनी चोख बजावली- शिवसेना

गोव्याच्या चौकीदाराची जबाबदारी पर्रीकरांनी चोख बजावली- शिवसेना

देशाचे माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी कर्करोगाने निधन झाले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.  मुख्यमंत्री म्हणून पर्रीकरांनी गोव्याचा चेहरा बदलला. गोवा हे पर्यटकांसाठी अंमली पदार्थांचे स्वर्गद्वार होते. त्यांनी ही ओळख पुसून टाकली. गोव्यात रस्ते, वीज, उद्योग यावर काम केले. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर ‘भाई’ म्हणून गोयंकरांत परिचित होते. भाऊसाहेब बांदोडकरांनंतर सर्वसामान्य गोवेकरांना आपला वाटेल असा सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला तो म्हणजे मनोहर पर्रीकर. तिरंग्यात लपेटलेल्या त्यांच्या मृतदेहास भारतीय सैन्याने खांदा दिला. अखेरची मानवंदना दिली, तेव्हा गोव्याने आपला चौकीदार गमावला व देशातून सचोटीचे प्रयाण झाले.

देशाच्या राजकारणातून ‘साध्या’, ‘सरळ’, पण तितक्याच कर्तव्यकठोर माणसाने कायमचा निरोप घेतला आहे. मनोहर पर्रीकर यांचे जाणे म्हणजे राजकारणातील सत्य-सचोटीचा दिवा विझण्यासारखे आहे. सध्या ‘चौकीदार’ या शब्दावर जोर दिला जात आहे, पण गोव्याच्या चौकीदाराची जबाबदारी पर्रीकरांनी चोख बजावली होती. पर्रीकर हे गोव्यासारख्या लहान राज्याचे मुख्यमंत्री होते. देशाचे संरक्षण मंत्रीपद त्यांनी काही काळ भूषवले, पण त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर जणू दुःख आणि शोक याचा सर्जिकल स्ट्राइक झाला. पर्रीकरांचे कमालीचे साधेपण व रक्ताच्या थेंबा थेंबातली सचोटी लोकांनी अनुभवली. त्यांनी हे सर्व न बोलता केले. साधेपणाचा बडेजाव मिरवला नाही. पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री तीन वेळा झाले. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचा हिंदू जनमानसावर असलेला प्रभाव आणि गोव्यातील ख्रिश्चनांचे प्राबल्य पाहता गोव्यात कधी भाजपचा मुख्यमंत्री होईल ही अशक्यप्राय गोष्ट होती, पण आयआयटीयन तरुण पर्रीकर हे पुन्हा गोव्यात परतले व त्यांनी संघ कार्यास वाहून घेतले.

1991 मध्ये त्यांनी उत्तर गोवा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. त्या वेळी काँग्रेस उमेदवाराकडून पर्रीकर पराभूत झाले, पण पर्रीकरांना मिळालेली मते गोव्याच्या नव्या राजकीय घडामोडींची नांदी ठरली. 1994 मध्ये पर्रीकर पणजी मतदारसंघातून गोवा विधानसभेत पोहोचले होते. भाजपचे चार सदस्य तेव्हा निवडून गेले, पण पर्रीकरांनी विरोधी बाकांवरून आणि गोव्याच्या रस्त्यांवर तत्कालीन काँगेस सरकारला नामोहरम केले. लढवय्या नेता म्हणून ते गोव्यातील जनतेच्या गळय़ातील ताईत बनले. पुढच्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या 21 आमदारांना विजयी करून विधानसभेत पोहोचले व मुख्यमंत्री झाले. अस्थिर गोव्याला त्यांनी स्थिर व कार्यक्षम सरकार दिले. आयाराम-गयारामांची दुकाने बंद केली. पंतप्रधान मोदी यांनी गाजवलेला ‘न खाऊंगा न खाने दूंगा’चा यशस्वी प्रयोग पर्रीकरांनी सर्वप्रथम गोव्यात केला. स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा पाया पर्रीकरांनी गोव्यात रचला व त्यावर श्री. मोदी यांनी कळस चढवला असे म्हणावे लागेल. पर्रीकर हे भाजपचे पहिले हिंमतबाज नेते. त्यांनी 2013 मध्ये गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ‘लोणचे’ झालेल्या वृद्ध नेत्यांनी बाजूला व्हावे व नव्या नेतृत्वाला संधी द्यावी, असे न डगमगता सांगितले. त्याच राष्ट्रीय कार्यकारिणीत पर्रीकर यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची प्रथम शिफारस केली. पुढे 2014 साली मोदी पंतप्रधान झाले व आपल्या मंत्रिमंडळात पर्रीकर यांना संरक्षणमंत्री म्हणून आणले. पण ‘सुशेगाद’ गोव्यात रमणाऱ्या पर्रीकरांना दिल्ली मानवली नाही. संरक्षणमंत्री म्हणून त्यांचा प्रामाणिकपणा व साधेपणा तसाच होता, पण संरक्षणमंत्री असूनही त्यांचे मन आणि पाऊले गोव्यातच वळत होती. त्यांच्या काळातही कश्मीरात सैनिकांची बलिदाने सुरूच होती. दहशतवाद्यांचे हल्ले सुरूच होते, पण उरी हल्ल्यानंतर पर्रीकरांमधील कणखर राष्ट्रभक्त उसळून उठला व पाकव्याप्त कश्मीरवर सर्जिकल स्ट्राइक करून हिंदुस्थानी सैन्याची ताकद व शौर्य जगाला दाखवून दिले. गोव्यासारख्या लहान राज्यातून ते दिल्लीत आले, पण राष्ट्रीय राजकारणाच्या महासागराच्या लाटांवर ते आरूढ झाले नाहीत. त्यांनी किनाऱयावर थांबणेच पसंत केले व संधी मिळताच 2016 साली ते पुन्हा गोव्यात येऊन मुख्यमंत्री झाले. पर्रीकर दिल्लीत पाय रोवून उभे राहिले असते तर एक मराठी चेहरा प्रदीर्घ काळ देशाच्या राजकारणात तेजाने तळपताना दिसला असता, पण गोवा हाच त्यांचा पंचप्राण होता. मुख्यमंत्री म्हणून पर्रीकरांनी गोव्याचा चेहरा बदलला. गोवा हे पर्यटकांसाठी अमली पदार्थांचे स्वर्गद्वार होते. त्यांनी ही ओळख पुसून टाकली. गोव्यात रस्ते, वीज, उद्योग यावर काम केले. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर ‘भाई’ म्हणून गोयंकरांत परिचित होते. भाऊसाहेब बांदोडकरांनंतर सर्वसामान्य गोवेकरांना आपला वाटेल असा सामान्य माणूस मुख्यमंत्री झाला तो म्हणजे मनोहर पर्रीकर. तिरंग्यात लपेटलेल्या त्यांच्या मृतदेहास हिंदुस्थानी सैन्याने खांदा दिला. अखेरची मानवंदना दिली, तेव्हा गोव्याने आपला चौकीदार गमावला व देशातून सचोटीचे प्रयाण झाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *