Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रोजगार मेळाव्याअंतर्गत ७१,००० सरकारी कर्मचार्‍यांना नियुक्ती पत्रांचे पंतप्रधानांनी केले वितरण

“नागरिकाचे म्हणणे नेहमी बरोबर असते, या सूत्राला धरून सेवाभावी वृत्तीने सेवा करा”

नव्याने नियुक्त्य झालेल्या उमेदवारांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

नवी दिल्ली/मुंबई, दि. २०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शासकीय विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे ७१,००० उमेदवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्ती पत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे वचन पंतप्रधानांनी दिले आहे. रोजगार मेळा हे या वचनाच्या पूर्ततेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे  पाऊल आहे. हा रोजगार मेळा या पुढे होणाऱ्या रोजगार निर्मितीला अधिक चालना देण्याकरता कामी येईल, आणि त्यासोबतच तरुणांना स्वतःला अधिक सक्षम करणासाठी तसेच देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी होता यावे यासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.

यावेळी पंतप्रधानांनी नवनियुक्त उमेदवारांशी संवादही साधला.

पश्चिम बंगालच्या सुप्रभा बिस्वास यांना पंजाब नॅशनल बँकेसाठीचे नियुक्तीपत्र प्रदान केले गेले. सर्वप्रथम त्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. नियुक्तीची औपचारिकता लवकरात लवकर पूर्ण केल्याबद्दल आणि सेवेची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. सुप्रभा यांनी आपले शिक्षण सुरु ठेवले असल्याबद्दलही पंतप्रधानांनी त्यांच्याकडे विचारणा केली. सुप्रभा यांनी त्या आयजीओटी मॉड्यूलशी संबंधीत असल्याचे सांगितले आणि या मॉड्यूलच्या फायद्याबद्दलची सविस्तर माहिती दिली. आपल्या कामाच्या ठिकाणी डिजिटल व्यवहारांना चालना देण्याबाबत पंतप्रधानांनी सुप्रभा यांच्याकडून जाणून घेतले. मुली प्रत्येक क्षेत्रात नव्या तऱ्हेने पाऊल टाकत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर इथल्या फैजल शौकत शाह यांना श्रीनगरमधल्या  एनआयटीमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्तीचे पत्र दिले गेले. त्यांनीही पंतप्रधानांशी संवाद साधला. फैजल यांनी सांगितले की, सरकारी नोकरी मिळालेले  त्यांच्या कुटुंबातले ते पहिले सदस्य आहेत. फैजल यांना मिळालेल्या या नियुक्तीबद्दल स्वतः फैजल यांना तसेच त्यांच्या सोबत्यांना काय वाटले याबद्दल पंतप्रधानांनी विचारपूरस केली. या नियुक्तीमुळे आपल्या मित्रांनाही सरकारी नोकरीत जाण्याची प्रेरणा मिळल्याचे फैजल यांनी पंतप्रधानांना सांगितले. आयजीओटी मॉड्यूलचे फायदेही त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. फैजलसारख्या तरुणांमळे जम्मू-काश्मीर नवी उंची गाठेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. फैजल यांनी  आपले शिक्षण सुरूच ठेवावे असा सल्लाही पंतप्रधानांनी दिला.

मणिपूरच्या व्हानेई चोंग यांना गुवाहाटीतील एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून नियुक्तीपत्र मिळाले. ईशान्य भारतातील आरोग्य क्षेत्रात काम करायला मिळावे हेच आपले स्वप्न होते असे व्हानेई यांनी सांगितले. इतर अनेकांप्रमाणेच त्या देखील सरकारी नोकरी मिळवणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील पहिल्याच असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पंतप्रधानांनी व्हानेई यांना निवड प्रक्रियेदरम्यान त्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागला का, आणि असे  झाले  असेल तर त्याबद्दलच्या अनुभवांबद्दल विचारपूस केली. आपल्या उत्तरात व्हानेई यांनी त्यांना त्यांचे   शिकणं यापुढेही सुरूच ठेवायचे असल्याचे सांगितले. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचारांशी संबंधीत तरतुदींविषयी आपल्याला अधिक जाणून घ्यायचे आहे, आणि त्याविषयी जनजागृतीही करायची आहे असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी व्हानेई यांची ईशान्य भागात नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले, तसेच  या क्षेत्राच्या विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे सांगितले.

बिहारमधील दिव्यांग उमेदवार राजू कुमार यांना पूर्व भारतीय रेल्वेत कनिष्ठ अभियंता म्हणून नियुक्तीपत्र मिळाले. दिव्यांग असलेल्या राजू यांनी पंतप्रधानांसोबतच्या संवादात आपला प्रवास उलगडून सांगितला, तसेच आयुष्यात आणखी पुढचे  यश गाठण्याची इच्छाही व्यक्त केली. आपल्या सहकाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी दिलेल्या पाठबळाबद्दलही त्यांनी सांगितले. राजू यांनी कर्मयोगी प्रारंभ अभ्यासक्रमाचे 8 अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत, यात त्यांना तणाव व्यवस्थापन आणि आचरण संहितेशी संबधीत अभ्यासक्रमाचा मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. पंतप्रधानांनीही राजू कुमार यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तेलंगणा इथल्या कन्नमाला वामसी कृष्णा यांना कोल इंडिया लिमिटेडमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षक म्हणून नियुक्तीपत्र मिळाले. यावेळी पंतप्रधानांनी कृष्णा यांच्या  पालकांनी  केलेली मेहनत आणि कष्टांची दखल घेतली. यावेळी कृष्णा यांनीही आपला प्रवास उलगडून सांगितला, या रोजगार मेळाव्यासाठी त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. कन्नमाला वामसी कृष्णा यांनाही हे मॉड्यूल अतिशय लाभदायक असल्याबद्दल, विशेषत: ते मोबाइलवर  उपलब्ध असल्यामुळे अधिक उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी कृष्णा यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि ते आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवतील अशी आशाही व्यक्त केली.

यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. हा २०२३ या वर्षातला पहिला रोजगार मेळावा असून, यातून ७१,००० कुटुंबांसाठी रोजगाराची मौल्यवान देणगी मिळाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी नियुक्ती मिळालेल्या सर्व नव्या उमेदवारांचे अभिनंदन केले, रोजगाराच्या या संधीमुळे केवळ नियुक्त झालेल्यांमध्येच नव्हे तर देशभरातील कोट्यवधी कुटुंबांमध्ये आशेचा नवा किरण निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनडीएशासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नियमितपणे रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत, त्यामुळे येत्या काळात नवीन लाखो  कुटुंबांतील सदस्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. आसाम सरकारने कालच आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याचा उल्लेख करून, येत्या काळात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड ही राज्येही लवकरच अशा मेळाव्याचे आयोजन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नियमितपणे आयोजीत होत असलेले हे रोजगार मेळावे म्हणजे आपल्या सरकारची एक ओळखच आहे असे ते म्हणाले. आपल्या नेतृत्वातले सरकार जे संकल्प करते, ते प्रत्यक्षातही साकारून दाखवते असं पंतप्रधान म्हणाले

नव्याने  नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसत असल्याचे नमूद करत पंतप्रधान म्हणाले, की यापैकी बहुतांश उमेदवार हे सर्वसामान्य पार्श्वभूमी असलेल्यांमधून आलेले आहेत आणि अनेक जण हे त्यांच्या कुटुंबातील पाच पिढ्यांत पहिल्यांदाच सरकारी नोकरी मिळवणाऱ्यांपैकी एक आहेत. ही बाब ,सरकारी नोकरी मिळविण्यापेक्षा अधिक मोठी आहे,असे पंतप्रधान म्हणाले. पारदर्शक आणि स्वच्छ भर्ती प्रक्रियेद्वारे त्यांच्या गुणांना मान्यता मिळाली याचा आनंद उमेदवारांना होत आहे.“तुम्हाला भरती प्रक्रियेत मोठे परीवर्तन झालेले जाणवले असेल.केंद्रीय नोकऱ्यांमधील, भर्ती प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित आणि कालबद्ध पद्धतीने होत आहे”, पंतप्रधान म्हणाले.

या भर्ती  प्रक्रियेतील पारदर्शकता आणि गतिमानता हे आजच्या सरकारी कामकाजाच्या प्रत्येक पैलूचे वैशिष्ठ्य आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.   एक काळ असा होता जेव्हा  नित्याच्या पदोन्नतींनाही विलंब होत असे आणि त्या वादात अडकवल्या जात असत असे सांगून पंतप्रधान पुढे म्हणाले,की या सरकारने अशा समस्यांचे निराकरण करत ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल,हे सुनिश्चित केले आहे.”पारदर्शक भरती आणि पदोन्नती यामुळे तरुणांमध्ये विश्वास निर्माण होतो”, ते म्हणाले.

आज ज्यांना त्यांची नियुक्तीपत्रे मिळाली आहेत त्यांच्यासाठी ही एका नव्या प्रवासाची सुरुवात असेल यावर भर देत,पंतप्रधानांनी राष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात सरकारी यंत्रणेचा एक भाग बनून हे तरुण कशाप्रकारे उत्तम योगदान आणि भागीदारी देऊ शकतील, हे अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले, की अनेक नवनियुक्ती कर्मचारी सरकारचे थेट प्रतिनिधी म्हणून सामान्य जनतेशी संवाद साधतील आणि ते आपल्या पद्धतीने  प्रभाव निर्माण करतील. ‘ग्राहक हा नेहमीच योग्य असतो’, या व्यापार-उद्योगजगतातील म्हणीशी साधर्म्य दाखवत पंतप्रधानांनी सूचना केली,की आपणही ‘नागरिक नेहमीच बरोबर असतो’ हा मंत्र प्रशासनात राबवायला हवा.’ “यामुळे सेवाभावी भावना वाढीस लागते आणि ती बळकटही होते”, असे सांगत पंतप्रधानांनी नमूद केले की जेव्हा एखादी व्यक्ती सरकारी पदावर नियुक्त होते तेव्हा त्याला सरकारी सेवा म्हणून संबोधले जाते,नोकरी नव्हे. १४० कोटी भारतीय नागरिकांची सेवा करता येण्याचा अनुभव घेताना  मिळणारा आनंदही त्यांनी अधोरेखित केला आणि त्याचा लोकांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे सांगितले.

इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग- iGOT कर्मयोगी या मंचावरून ऑनलाइन अभ्यासक्रम  पूर्ण  करणाऱ्या  सरकारी सेवेतील व्यक्तींचा  संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की,अधिकृत प्रशिक्षणाव्यतिरिक्त या व्यासपीठावर वैयक्तिक विकासासाठी देखील अनेक अभ्यासक्रम आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वयंशिक्षण ही आजच्या पिढीसाठी सुसंधी आहे,असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी त्यांचे स्वतःचे उदाहरण दिले आणि सांगितले की त्यांनी कायम त्यांच्यातील विद्यार्थी जागृत ठेवला.”स्वयं-शिक्षणाची वृत्ती  शिकणाऱ्याच्या क्षमता, त्यांच्या संस्था यासोबतच  भारताच्याही क्षमता वृद्धिंगत करेल” असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “झपाट्याने बदलणाऱ्या भारतात,रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे.वेगवान विकासामुळे  स्वयंरोजगाराच्या संधींचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होतो.  आजचा भारत याचा साक्षीदार आहे.”

देशात पायाभूत विकासाच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून गेल्या आठ वर्षांत रोजगाराच्या लाखो संधी निर्माण झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.पायाभूत सुविधांमध्ये शंभर लाख कोटी गुंतवणुकीचे उदाहरण‌ त्यांनी दिले आणि नव्याने बांधलेल्या   मार्गावर रोजगाराच्या संधी कशा वाढतात याचे उदाहरण दिले, आणि नमूद केले की नवीन रस्ते किंवा रेल्वे मार्गांच्या परिघात नवीन बाजारपेठा उदयास येतात आणि शेतातून अन्नधान्याची वाहतूक करणे खूप सुलभ होते  आणि पर्यटनाला देखील चालना देते.  “या सर्व शक्यतांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

प्रत्येक गावात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या भारत-नेट प्रकल्पाचा संदर्भ देत, पंतप्रधानांनी ही कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे तयार झालेल्या रोजगाराच्या नवीन संधींवर प्रकाश टाकला.जे तंत्रज्ञान फारसे जाणत नाहीत त्यांनाही त्याचे लाभ समजतात असे पंतप्रधान म्हणाले.यामुळे खेड्यापाड्यात ऑनलाइन सेवा देण्याचे उद्योजकतेचे नवे क्षेत्र खुले झाले आहे. पंतप्रधानांनी  दुय्यम स्तर(टायर 2) आणि तृतीय स्तरावरील (टायर 3) शहरांमध्ये भरभराट होत असलेल्या स्टार्टअप उद्योगांचीही दखल घेतली आणि सांगितले की या यशाने जगातील तरुणांसाठी एक नवीन ओळख निर्माण केली आहे.

नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांच्या प्रवासाची आणि प्रयत्नांची प्रशंसा करून त्यांना देशातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळत असल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले आणि ते कशामुळे इथवर पोहोचले,हे लक्षात ठेवण्याचे आवाहन केले आणि त्यांना विनम्र राहून सेवा करत राहण्याचे आवाहन केले. “देशाला पुढे नेण्यासाठी तुम्ही स्वतः शिकत राहिले पाहिजे आणि स्वतःला सक्षम बनवत राहिले पाहिजे”, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *