बोगस भरती जाहिरातींविरोधात शासन सतर्क
मुंबई, दि. १८ : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू असल्याचा दावा करणाऱ्या बोगस जाहिराती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याने राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. अशा खोट्या जाहिरातींना बळी पडून बेरोजगार युवक आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. या प्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्तींविरोधात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास यंत्रणांकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
राज्यात व्हॉट्सॲपसह विविध सामाजिक माध्यमांवर “रोजगार हमी योजना विभागांतर्गत महाराष्ट्रात तात्काळ भरती, स्थिर नोकरीची आकर्षक संधी” अशा आशयाची जाहिरात वेगाने प्रसारित करण्यात येत आहे. या जाहिरातीत कार्यक्रम तांत्रिक अधिकारी, सहायक कार्यक्रम अधिकारी आणि लिपिक सह डेस्क अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अर्ज नोंदणीसाठी तब्बल १ हजार ५०० रुपये शुल्क आकारण्याची अट घालण्यात आली असून, ५८ वर्षांपर्यंत कराराधारित नोकरीचे आमिषही दाखविण्यात आले आहे.
मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले की, शासनामार्फत अशा प्रकारची कोणतीही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. रोजगार हमी योजना विभागाने कोणतीही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केलेली नसून सोशल मीडियावर प्रसारित होणारी माहिती पूर्णपणे खोटी, दिशाभूल करणारी आणि फसवणुकीच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे. नागरिकांनी अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, कोणत्याही अनोळखी खात्यावर पैसे जमा करू नयेत आणि केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवरील माहितीवरच विश्वास ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
विशेषतः ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना लक्ष्य करून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. शासनाच्या नावाचा गैरवापर करून बनावट भरती प्रक्रिया राबविणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, राज्य शासनाने नागरिकांना कोणतीही शासकीय भरती प्रक्रिया सुरू असल्यास संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत प्रसिद्धीपत्रकांद्वारेच माहिती तपासण्याचे आवाहन केले आहे. सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर युवकांनी विशेष दक्षता बाळगण्याची गरज असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
रोजगार हमी योजना विभागाने संबंधित जाहिरातींची सखोल चौकशी सुरू केली असून, सोशल मीडियावरून दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्ती आणि गटांचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि सायबर यंत्रणांची मदत घेतली जात आहे. शासनाची प्रतिमा मलीन करण्याचा तसेच बेरोजगार युवकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
