Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सफर साता समुद्रापार ची; अनुभवा रिओ दे जेनीरो, ब्राझिल माझ्यासोबत

सफर साता समुद्रापार ची; अनुभवा रिओ दे जेनीरो, ब्राझिल माझ्यासोबत

मनौस शहरात कार्गो डिस्चार्ज करून आम्ही पुन्हा एकदा अमेझॉन नदीमार्गे समुद्राकडे निघालो होतो. पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीचं पाणी गढूळलेलं होतं. त्या पाण्यासोबत कितीतरी झाडं आणि ओंडके पाण्यासोबत वाहताना दिसायचे. नदीच्या विशाल पात्रामध्ये असंख्य वळणे घेत घेत आमचं जहाज फुल स्पीड मध्ये निघालं होतं. मनौस बंदरावर जातांना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्याने जहाजाचा वेग कमी होता. पावसाळा असल्याने प्रवाहाचा वेग आणि नदीची पातळी दोन्ही वाढली होती. समुद्राच्या दिशेने नदीच्या प्रवाहासह चालल्याने जहाजाचा वेग जवळपास दीडपटीने वाढला होता. त्यामुळे जाता वेळेस अमेझॉन नदीच्या काठावर वसलेली लहान लहान गावे, घरे, डोंगर, टेकड्या उंचच झाडे, वेली येणाऱ्या जाणाऱ्या लहान मोठ्या होड्या प्रवासी लाँचेस आणि एकूणच सृष्टी व सौंदर्य हे सगळं स्लो मोशन मध्ये बघितलं आणि पुन्हा तीच दृश्ये नदीच्या प्रवाहासोबत जाताना फास्ट फॉरवर्ड मोड मध्ये बघत असल्याचा भास झाला. नदीच्या किनाऱ्यावर असलेली मोकळी मैदान त्यावर शांतपणे चरणारी असंख्य गुरेढोरे पाहून बरे वाटायचं. अमेझॉनच्या सुपीक खोऱ्यात पिकणारा भाजीपाला आणि फळाफुलांनी भरलेल्या लहान मोठ्या होड्या दिसायच्या. नारळ, कलिंगड आणि अननस यांनी भरलेल्या होड्या दिसल्या कि कॅप्टन जहाजाचा वेग कमी करून त्यांची बोट जहाजवळ आणायला सांगून डिझेल किंवा पैशांच्या बदल्यात जहाजासाठी फळे विकत घ्यायचा. बऱ्याच वेळा तर कोळंबी आणि मासे सुद्धा मासेमारी करणाऱ्या बोटींकडून घेतले जायचे. अव्होकाडो नावाचं फळ आहे हे पहिल्यांदा जहाजवरच कळलं. एक दिवस अव्होकाडो पासून बनवलेलं मिल्कशेक आणि त्याच्या पुढच्या दिवशी शहाळ्याचं पाणी सकाळी ब्रेकफास्ट ला ठेवलं जायचं आणि ज्याला हवं तेवढं मिळायचं. अमेझॉन नदीतील सफारीनंतर आजपर्यंत जहाजावर अव्होकाडो चा मिल्कशेक आणि शहाळ्याचे पाणी परत कधी मिळालं नाही. मनौसला जाताना साडेतीन दिवस लागले आणि येताना जवळपास अडीच दिवसात बाहेर पडणार होतो. पुढे 12 ते 13 तास खाडी संपून जहाज प्रत्यक्ष समुद्रात येणार होतं. अमेझॉन नदीच्या गढूळलेल्या पाण्याचा रंग खाडीत आल्यावर फिका फिका व्हायला लागला. खाडीतून पुढे येता येता अथांग पसरलेल्या समुद्राचे रंग आणि रूप दोन्ही दिसण्यास सुरवात झाली होती.

20 ते 21 दिवस पहिले खाडी मग नदीतून जात असल्याने जहाज अत्यंत स्थिर असायचे बिलकुल हेलकावत नसायचं पण जसजशी खाडी संपून समुद्रात जायला लागलो तस तसं पाणी स्वच्छ आणि नितळ व्हायला लागलं लांब पाहिलं तर निळशार दिसावं आणि जवळ पाहावं तर अत्यंत नितळ. समुद्रातल्या लाटांमुळे जहाज हेलकवायला सुरवात झाली होती. पहिल्यांदाच जहाजावर असताना समुद्रात आलो होतो. भाऊचा धक्का ते रेवस किंवा मांडवा ते गेटवे पर्यंत लाँच आणि श्रीवर्धनला मच्छी बोटमध्ये याशिवाय कधी समुद्रातील हेलकावणं अनुभवलं नव्हतं. समुद्रात वारा सुटल्याने लाटांमुळे जहाज हेलकावत होत आणि त्यामुळे डोकं जड होऊन दिवसभर जांभया येत होत्या झोप आल्यासारखी वाटायची पण झोप लगायचीच नाही. समुद्रात येऊन दोन दिवसानंतर समुद्रातल्या समुद्रात जिथून जमीन सुद्धा दिसत नव्हती अशा ठिकाणी लोखंडाच्या तरंगणाऱ्या विशाल बॉलसारख्या प्लॅटफॉर्मला ज्याला बोया असे म्हणतात त्याला जहाज बांधलं गेले आणि समुद्रातून एक पाण्याखालून आलेला एक पाईप जहाजाला जोडून त्याद्वारे जहाजावर कार्गो लोड केला गेला. कार्गो लोड झाल्याने जहाजाचे हेलकावणं कमी झालं होतं आणि आम्ही डीसचार्ज पोर्ट कडे रवाना झालो होतो. आजवर भूगोलाच्या पुस्तकात आणि इतिहासात वारंवार ऐकलेल्या रिओ दि जानेरीओ शहराच्या बंदरात आम्ही कार्गो घेऊन निघालो होतो.

संध्याकाळच्या सुमारास क्षितिजावर डोंगरसदृश आकृत्या दिसू लागल्या मागील 4 दिवस फक्त पाणी आणि पाणीच दिसत होतं चारही बाजूला. जस जसे पुढे पुढे येत होतो तसं तसे डोंगर मोठं मोठे दिसायला लागले. एका डोंगरावर अलिंगनासाठी लांब हात पसरलेल्या व्यक्तीची आकृती दिसत होती पण संध्याकाळ ओसरून अंधार पडायला सुरुवात झाली होती. त्या लांब हात पसरलेल्या आकृतीवर लाईटचे फोकस मारल्यामुळे जसजसा अंधार पडत होता तसतशी ती आकृती उजळून निघत होती. रिओ दि जानेरीओ शहर स्पष्ट दिसायला लागलं होतं आणि डोंगरावर जी आकृती होती ती म्हणजे जगातील सात आश्चर्यांपैकी एक असे मानला जाणारा ख्राईस्ट द रेडिमेर नावाने ओळखला जाणारा येशू ख्रिस्ताचा पुतळा होय.
हा पुतळा कितीतरी मैलांवरून दिसायला लागतो 30 मीटर उंच आणि 28 मीटर रुंद पसरलेले हातांमुळे रिओ शहरात येतानाच आपल्याला अलिंगन देऊन स्वागत करण्यासाठी येशू ख्रिस्त हात पसरून वाट बघतोय असं वाटल्याशिवाय रहात नाही. रिओ दि जानेरीओ शहरात त्या रात्री जहाजाला प्रवेश मिळणार नव्हता म्हणून जहाजाला शहरापासून थोड्याच अंतरावर नांगर टाकण्यास सांगितले गेले. रिओ शहर लाईटच्या प्रकाशात उजळून निघालं होत. रात्र पडली तरी फक्त संपूर्ण शहरात ख्राईस्ट द रेडिमेरचा डोंगरावरील पुतळा सगळ्यांचे लक्ष वेधत होता त्याचे निर्माणच अशा ठिकाणी केले होते की रिओ दे जानेरीओ शहरातील कोणत्याही भागातून त्याला बघता येण्यासारखे होतं.

जहाज खाडीच्या तोंडावर नांगर टाकून उभं होत पण रात्री अचानक जोराचा वारा सुटला आणि जहाज जोर जोरात हेलकावे खायला लागले. एवढं जोरात हलत होत की बेडवर झोपणं शक्यच नव्हतं जर बेड पूर्व पश्चिम दिशेला असेल तर त्या वेळी केबिन मधला सोफा उत्तर दक्षिणेला असायचा मग जहाज अस हलायला लागलं की सोफ्यावर अंग टाकून बऱ्याच वेळाने कधीतरी झोप लागत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी रिओ दे जानेरीओ शहराच्या मधून येणाऱ्या नदीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळाली आणि जहाज नांगर उचलून शहराच्या जवळील खाडीपत्रात नांगर टाकून कार्गो डीसचार्ज करण्याकरिता जेट्टी मोकळी होण्याकरिता थांबविण्यात आले. दुसऱ्या दिवशी कॅप्टन ने सिटी टुर अरेंज केली ज्यात माझासुद्धा नंबर लागला होता. ब्राझील मध्ये उतरल्यापासून बघत होतो की इथली संस्कृती खूपच वेगळी आहे. आपल्याकडे रस्त्यावर जशा वडापावच्या किंवा चायनिजच्या गाड्या उभ्या असतात तशाच प्रकारे ब्राझील मध्ये गल्लो गल्ली अशा प्रकारच्या खाण्याच्या गाड्या असतात दोन तीन टेबल का होईना मांडलेले असतात आणि त्यावर बहुतेक सर्वच वयोगटातले स्त्री पुरुष संध्याकाळपासूनच बिअर आणि दारूचे ग्लास भरून बसलेले असतात. एका गल्लीत कमीत कमी एखाद्या छोट्याशा हॉटेल बाहेर गिटार आणि ड्रम्स घेऊन एक दोघे जण काही तरी गुण गुणत असतात. नाहीतर स्पिकरवर काहीना काही तरी वाजतच असतं. आपल्याकडे गल्ली बोळात जस क्रिकेट खेळणारे दिसतात त्याच प्रकारे ब्राझीलच्या गल्ली बोळात फुटबॉल खेळणारे दिसल्याशिवाय रहात नाही. ब्राझीलमध्ये पाण्याच्या बाटली पेक्षा शहाळ्याचे पाणी स्वस्त मिळायचं आणि शहाळ्याच्या पाण्यापेक्ष बिअर चा कॅन स्वस्त मिळायचा.

रिओ दे जानेरीओ मधील फुटबॉल स्टेडियम, जगप्रसिद्ध कार्निवल फेस्टिवल होतो ते रस्ते आणि म्युझीयम बघून आम्ही डोंगरावर असलेल्या ख्राईस्ट रेडिमेरचा पुतळा बघायला वर डोंगरावर गेलो. डोंगरावर शहराजवळ असूनदेखील घनदाट जंगल होतं. एका ठिकाणी गाडी थांबवली आणि तेथून फुनिक्युलर ट्रॉलीतून पुतळ्याच्या पायथ्याशी नेण्याची सोय केली होती. फुनिक्युलर ट्रॉली हि अत्यंत तीक्ष्ण उतारावर चालवण्यात येत होती अंतर कमी पण उतार उंचीमुळे तीव्र उतार जवळपास 65 ते 70 अंशाच्या कोनात हि ट्रॉली वर खाली यायची. पर्यटकांच्या गर्दीने ख्राईस्ट रेडिमेर पुतळ्याचा परिसर फुलून गेला होता. कमालीची स्वच्छता व परिसराचे आणि गर्दीचे व्यवस्थापन अत्यंत चांगल्या प्रकारे केले जात असल्याचे दिसून आले. पुतळ्याची 30 मीटर म्हणजे 100 फूट उंची आणि जवळपास तेवढेच रुंद पसरलेले दोन्ही हात डोळ्यात मावत नव्हते वर बघितले कि येशू ख्रिस्त आपल्यावर नजर रोखून खाली अंगावर पडतो की काय अस कोणालाही वाटावे, त्यामुळेच हा पुतळा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे याची खात्री पटली. खाली पहिले तर संपूर्ण रिओ दे जानेरीओ शहर दिसत होते. एका बाजूला रेसकोर्स त्यावर धावणारे घोडे एका बाजूला शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्या. एका बाजूला उंचच उंच डोंगर रांगा आणि एका बाजूला विशाल आणि अथांग निळा समुद्र. पुतळाच काय सगळी सृष्टी आणि तीच सौंदर्य डोळ्यात मावत नव्हतं.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *