Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

युद्ध नव्हे, शांतीच्या मार्गानं प्रश्न सोडवावा – राज ठाकरे

Raj Thackarey

युद्ध नव्हे, शांतीच्या मार्गानं प्रश्न सोडवावा – राज ठाकरे

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी विमानांनी केलेली घुसखोरी हाणून पाडण्यासाठी त्यांचा माग काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. त्यानंतर आता जिनिव्हा कराराचा हवाला देत त्यांना सोडून देण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तानशी युद्ध नव्हे तर शांतीच्या मार्गानं प्रश्न सोडवावा, असे आवाहन केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचं केलेलं आवाहन माझ्या पाहण्यात आलं. अशा प्रकारचं आवाहन त्यांनी पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतरही केलं होतं. या हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई सेनेने जो हल्ला चढवला तो आवश्यक होता. त्याबद्दल मी भारतीय हवाई दलाचं अभिनंदन देखील केलं होतं. काल पुन्हा इम्रान खान यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे आणि इतकंच नव्हे तर त्यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून सर्व मुद्द्यांवर चर्चेत तयारी दर्शवली आहे. अशा प्रकारे चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्व. अटलबिहारी वाजपेयीजी आणि परवेझ मुशर्रफ यांच्या काळात आली होती. अटलजींनी सदा-ए-सरहद ही लाहोरपर्यंतची बससेवा सुरू केली. समझौता एक्स्प्रेस सुरू केली.

आग्र्यात ऐतिहासिक चर्चा झाली. पण दुर्दैवानं ह्या चर्चा पूर्णत्वाला जाऊ शकल्या नाहीत. जी संधी अटलजींच्या काळात दोन्ही देशांच्या हातातून निसटली आहे ती संधी पुन्हा आपल्यासमोर आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया ही दोन कट्टर शत्रूराष्ट्र चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुढे येऊ शकतात तर आपण का नाही येऊ शकत?, युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मिरी जनता देखील भरडली जाईल. हे कोणालाच परवडणारं नाही. अतिरेक्यांना ठेचलेच पाहिजे आणि ते देखील निष्ठुरपणे म्हणून युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून राजकीय फायदा पण कोणी घेऊ नये. दोन्ही देशांत ज्या समस्या आहेत त्यावर चर्चेतून मार्ग काढावा आणि दोन्ही देशांत शांततेचं वातावरण निर्माण व्हावं हीच इच्छा आहे.

पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल हे त्यांनीच उचलायला हवं, ते म्हणजे त्यांच्या कैदेत असलेल्या आमच्या वैमानिकाला, अभिनंदन ह्यांना त्यांनी तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमा रेषेवरचा गोळीबार तात्काळ थांबलाच पाहिजे. जर ह्या गोष्टी घडल्या तर म्हणता येईल की इम्रान खान यांचे हेतू स्वच्छ आहेत. आणि तसं घडलं तर मात्र नरेंद्र मोदींनी देखील ही संधी गमावता कामा नये.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *