विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या आमदार अपात्रतेसंबंधी याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
नवी दिल्ली/मुंबई, दि. २२: मागील दोन वर्षांपासून राज्यातील जनता मोठ्या राजकीय उलथापालथी पाहते आहे. आधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातली शिवसेना फुटली आणि नंतर शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठं खिंडार पडलं. यावेळी दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. याच सोबत निवडणूक आयोगाकडेही त्यांनी दाद मागितली. दरम्यान आमदार अपात्रतेबाबत निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी निकाल सुनावत दोन्ही शिवसेनेच्या आमदारांना अपात्र न करण्याचा निर्णय घेतला. अखेर आमदार अपात्रेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उद्या दिनांक २३ जुलै रोजी याच याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
यासंदर्भात झालेल्या मागच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले होते. सुनावणीत हे दस्तऐवज सादर केले जाण्याची शक्यता आहे. आमदार अपात्रतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Source – AIR