राघव चड्ढा यांचा ‘आप’ला धक्का; दोन-तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये जाण्याची घोषणा
नवी दिल्ली, दि. २४ : आम आदमी पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, ते पक्षातील दोन-तृतीयांश खासदारांसह भारतीय जनता पक्षात सामील होणार आहेत.
पत्रकार परिषदेत राघव चड्ढा यांनी स्पष्ट केले, “आम्ही, राज्यसभेतील ‘आप’चे दोन-तृतीयांश सदस्य, भारतीय संविधानातील तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “ज्या ‘आप’ला मी माझ्या रक्ताने आणि घामाने वाढवले आणि माझ्या तारुण्याची १५ वर्षे दिली, तो पक्ष आता आपल्या तत्त्वांपासून दूर गेला आहे. हा पक्ष आता देशहिताऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी काम करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मी ‘आप’पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.”
या पत्रकार परिषदेत संदीप पाठक आणि अशोक मित्तल हेही उपस्थित होते. राघव चड्ढा यांनी सांगितले की, राज्यसभेतील ‘आप’चे एकूण १० खासदारांपैकी ७ जण त्यांच्या भूमिकेला समर्थन देत आहेत. यामध्ये राघव चड्ढा, संदीप पाठक, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवली, क्रिकेटपटू हरभजन सिंग, आणि अशोक मित्तल यांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आम आदमी पार्टी ने २ एप्रिल रोजी राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले होते. त्यानंतर त्यांच्या बोलण्याचा वेळ कमी करण्याबाबत राज्यसभा सचिवालयाला पत्रही पाठवण्यात आले होते. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती.
३ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये राघव चड्ढा यांनी पक्षावर अप्रत्यक्ष टीका करत म्हटले होते, “मी संसदेत सार्वजनिक प्रश्न मांडले. हा गुन्हा आहे का? माझा आवाज दाबला गेला, पण माझ्या मौनाला पराभव समजू नका. मी एक नदी आहे, जी वेळ आल्यावर पूर धारण करते.”
राघव चड्ढा यांनी संविधानातील तरतुदींचा उल्लेख करत सांगितले की, दोन-तृतीयांशपेक्षा अधिक खासदार एखाद्या पक्षातून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात. “हा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी स्वतःचा व्यावसायिक पार्श्वभूमीचा उल्लेख करत सांगितले की, राजकारणात येण्यापूर्वी ते चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत होते.
दरम्यान, अशोक मित्तल यांच्याशी संबंधित ठिकाणांवर १५ एप्रिल रोजी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकल्याची माहिती समोर आली होती. जालंधर, गुरुग्रामसह विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली होती. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात या निर्णयाचे राजकीय परिणाम काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
