‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद; पितृसत्ताक मानसिकतेवर राहुल गांधींची टीका
पुणे, दि. २२ : महिलांकडे केवळ मुलगी, पत्नी किंवा आई या कौटुंबिक भूमिकांमधून पाहण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिलांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मुद्दा पुण्यात मांडला. ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थिनी आणि महिलांशी थेट संवाद साधत शिक्षण, नोकरी, कुटुंबातील हक्क, स्वातंत्र्य आणि मालमत्तेतील अधिकार यांसारख्या प्रश्नांवर चर्चा केली. देशाची खरी ताकद ही कोट्यवधी नागरिकांच्या स्वप्नांमध्ये आणि विचारांमध्ये आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
राहुल गांधी कार्यक्रमात पोहोचल्यानंतर त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यांच्या शर्टवर ‘गर्ल पॉवर’चा बॅजही होता. हा कार्यक्रम राजकीय भाषणासाठी नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि महिलांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी दिली. त्यांच्या मते, तरुणांनी काय विचार करावा यापेक्षा ते स्वतः काय विचार करतात आणि देशाकडून काय अपेक्षा ठेवतात, यावर चर्चा होणे अधिक महत्त्वाचे आहे.
महिलांची ओळख केवळ कौटुंबिक नात्यांपुरती मर्यादित नको
महिलांच्या सामाजिक स्थानावर बोलताना राहुल गांधी यांनी मुलगी, पत्नी आणि आई या भूमिका महत्त्वाच्या असल्या तरी त्यांच्यापलीकडेही महिलेचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते, असा मुद्दा मांडला.
ते म्हणाले, “देशातल्या मुलींनी स्वतंत्र होणं गरजेचं आहे. वडील, नवरा आणि मुलं यांच्याशी तुमचं नातं आहे. तुमची ओळख त्यांच्यामुळे नाही. मनूस्मृती सांगतं की स्त्री वडील, नवरा व मुलगा यांची संपत्ति आहे. हे लाजिरवाणं आहे. महिलांनी स्वतंत्र व्हायला हवं. त्या कोणावरही अवलंबून नाहीत.”
महिलेचे अस्तित्व तिच्या कुटुंबातील नात्यांवर किंवा इतर व्यक्तींवरील अवलंबित्वावर ठरवले जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याची आणि स्वतःच्या आयुष्याबाबत स्वतंत्रपणे पुढे जाण्याची संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांच्या भाषणातून अधोरेखित झाले.
कुटुंबातील हक्कांवरही संवाद
कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी एका महिलेशी कुटुंबातील मालमत्तेतील हक्काच्या प्रश्नावर संवाद साधला. पुरुषाने कुटुंबातील हिस्सा मागितल्यास त्याला अधिकार मानले जाते; मात्र महिलेकडून त्याच हक्काची मागणी झाली तर त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
यावर संबंधित महिलेने कुटुंबाकडून महिलांकडून नोकरीसोबत घरातील जबाबदाऱ्यांचीही अपेक्षा केली जात असल्याचे सांगितले. नोकरी करून घरी परतल्यानंतर घरकाम, जेवण आणि मुलांची जबाबदारीही महिलांनीच सांभाळावी, अशी सामाजिक अपेक्षा अद्याप कायम असल्याचे तिने नमूद केले.
मंचावरच विद्यार्थिनी आणि महिलांशी थेट चर्चा
राहुल गांधी यांनी भाषणापुरता संवाद मर्यादित न ठेवता काही महिला आणि विद्यार्थिनींना मंचावर बोलावून त्यांच्या अनुभवांबाबत चर्चा केली. पुरुषांनी महिलांवर नियंत्रण ठेवण्याची गरज का भासते, तसेच पितृसत्ताक व्यवस्थेचा महिलांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
एका महिलेने समाजाकडून महिलांना त्यांच्या लिंगाच्या आधारे वेगळी वागणूक मिळत असल्याचा अनुभव सांगितला. ‘तू मुलगी आहेस’, ‘सुंदर आहेस’, ‘कोणीही तुझ्याशी लग्न करेल’ अशा चौकटीत महिलांकडे पाहिले जाते, अशी खंत तिने व्यक्त केली.

शिक्षण, नोकरी आणि स्वातंत्र्याचा मुद्दा
राहुल गांधी यांनी मुलींच्या शिक्षणाबाबतही समाजातील भेदभावाच्या मानसिकतेवर टीका केली. मुलीपेक्षा मुलाच्या शिक्षणाला अधिक महत्त्व देणे, मुलींना नोकरी करण्यापासून रोखणे किंवा आधुनिक विचार स्वीकारणाऱ्या मुलींकडे संशयाने पाहणे, या प्रवृत्ती बदलण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
त्यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार, ६० टक्के महिला घराबाहेर एकट्या जाऊ शकत नाहीत. तसेच ४५ टक्के महिला विवाह किंवा घरकामाच्या कारणामुळे शिक्षणातून बाहेर पडतात, असा दावा त्यांनी केला. देशातील केवळ ८ टक्के महिलांच्या नावावर स्वतंत्र मालमत्ता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिलांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक पातळीवरील नसून तो शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबन आणि कुटुंबातील समान हक्कांशी जोडलेला असल्याचे राहुल गांधी यांच्या संवादातून स्पष्ट झाले.
पुण्यातील या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ ऐकणारे श्रोते न ठेवता त्यांच्या अनुभवांवर आणि प्रश्नांवर चर्चा केली. महिलांच्या स्वतंत्र ओळखीचा आणि निर्णयस्वातंत्र्याचा मुद्दा पुढे नेत त्यांनी सामाजिक मानसिकतेत बदलाची गरज अधोरेखित केली.
