Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

माझी ‘दर्या’दिली : नवीन जहाजाची जॉइनिंग व्हाया सिंगापूर 

माझी ‘दर्या’दिली : नवीन जहाजाची जॉइनिंग व्हाया सिंगापूर

सिंगापूर एअरलाईन्स च्या विमानाने सिंगापूरला उतरलो. विमानतळावरून मला आणि चीफ इंजिनीयर दोघांनाही सरळ जहाजावर सोडण्यात येणार होत. विमानतळावर घ्यायला आलेल्या एजंट ने माहिती दिली की जहाज सिंगापूर अँकरवर आज येऊ शकणार नाही. सिंगापूर जवळच्या एका बंदरात कार्गो डीसचार्जिंगला उशीर होतोय त्यामुळे आज हॉटेल मध्ये थांबावे लागेल. एजेंट ने त्याच्या गाडीतून आम्हाला हॉटेल मध्ये ड्रॉप करून रूम मिळवून दिल्या. सकाळी हॉटेलच्या डायनिंग हॉल मध्ये नाश्त्यासाठी गेलो. डायनिंग हॉल गर्दीने फुलून गेला होता. बुफे सिस्टिम मध्ये फक्त चायनिज आणि काँटिनेंटल फूड होत. फळ आणि ऑम्लेट खाऊन नाश्ता उरकला. सकाळी नऊ साडेनऊ वाजता चीफ इंजिनियरला विचारलं की कुठे जाऊ या का बाहेर तो म्हणाला मी नाही येत, तू फिरून ये. मी हॉटेल बाहेर पडलो निघताना रिसेप्शन वरून सिंगापूर सिटी चा टुरिस्ट मॅप घेतला. रस्ते आणि फुटपाथवर वर कमालीची स्वच्छता दिसत होती. हॉटेल असलेला परिसर अत्यंत गजबजलेला होता तरीपण तिथे असणारी हिरवीगार झाडे आणि फुलांचे ताटवे लक्ष वेधून घेत होती. रस्त्यांवर धावणाऱ्या पॉश बसेस आणि कार सिग्नल लागल्याबरोबर सफाईदार पणे पांढऱ्या रेषेच्या आत थांबत होत्या. ऑफिसची वेळ झाल्याने रस्त्यावर बरीच वर्दळ होती. हॉटेल पासून मरिना बीच जवळच होतं तिथून चालत चालत मरिना बे सॅन्ड्स हॉटेल समोर आलो. तीन उंच बिल्डिंगच्या शेवटच्या माजल्यांवर जहाजासारखं दिसणारा भाग बनवला गेलाय आणि दोन्ही बिल्डिंगना या जहाजाच्या सारख्या भागाने खूप वरच्या मजल्यांवर जोडण्यात आले आहे.

या बिल्डिंगच्या पाठीमागे मेरलीन पार्क नावाचं सिंगापूर मधील सगळ्यात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मेरलिऑन च्या मुखातून बाहेर पडणाऱ्या पाण्याजवळ सगळे पर्यटक फोटो आणि सेल्फी काढताना दिसत होते. कोरिया आणि जपान हुन आलेल्या पर्यटकांच त्यांच्या भाषेत चालेल च्यांव चुइं ऐकायला मजा वाटत होती. जिकडे तिकडे पॉश बिल्डिंग दिसत होत्या, रस्ते सुद्धा पॉश वाटत होते. मेरलीओन पार्कवर फोटो काढून मग परत हॉटेल वर परतलो. दुपारी हॉटेल मध्ये असलेलं कॉंटिनेंटल जेवण जीवावर येऊन कसंबसं खाल्लं पण संध्याकाळी सिंगापूर मधील इंडियन रेस्टॉरंट शोधून काढलं आणि तिथे जेवून पुन्हा हॉटेलवर परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा नंतर एजंट जहाजावर नेण्यासाठी आला. कस्टम्स आणि इमिग्रेशन क्लीयर झाल्यावर छोट्या स्पीड बोट मधून जहाजावर सोडण्यात आलं. जवळपास सव्वालाख टन कार्गो वाहून नेण्याची क्षमता असलेल्या जहाजावर पहिल्यांदाच आलो होतो. अकरा महिन्यांच्या लांब लचक सुट्टीनंतर एवढ्या मोठ्या जहाजावर पहिल्यांदाच काम करण्याच दडपण आल होतं. पहिल्यांदा करा किंवा चौथ्यांदा करा जेव्हा जहाज आणि त्यावरील सगळ्या मशिनरी चालू राहिल्या पाहिजेत याच दडपण प्रत्येकावर सतत असतं.

चीफ इंजिनीयर सोबत 3 वर्षांपूर्वी एका जहाजावर मी फोर्थ इंजिनीयर म्हणून काम केलं होतं त्यामुळे तो मला चांगला ओळखत होता. एका जहाजावर पूर्वी काम केलेल कोणी सोबत असले की थोडस हायसं वाटतं. या जहाजावर मी थर्ड इंजिनीयर म्हणून जॉईन झालो होतो, मागच्या जहाजावर घरी जायच्या पंधरा दिवस अगोदरच प्रमोशन मिळालं होतं. मी अकरा महिने घरी राहिल्याने आणि थर्ड इंजिनीयर म्हणून पंधरा दिवस अनुभव असल्याच समजल्यावर सेकंड इंजिनीयरच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. मी एवढ्या मोठ्या जहाजावर पहिल्यांदाच आल्यामुळे मला काम कसे जमेल जहाज आणि सगळ्या मशिनरीची माहिती व्हायला किती दिवस जातील याच दडपण माझ्यापेक्षा सेकंड इंजिनीयरलाच आलं होतं. दोन वर्षे घरी रहा किंवा दोन महिने घरी रहा पुन्हा त्याच जहाजावर जा किंवा इतर कुठल्याही जहाजावर घरून येणारा प्रत्येक जण काम करण्यासाठीच येत असतो पण येणारा प्रत्येक जण स्वतःच मन मारून घर आणि कुटुंब सोडून येत असतो एवढं मात्र नक्की असतं.

दारू पासून चार हात लांब राहिल्याने जहाजावर दारू मिळो किंवा न मिळो त्यामुळे मला कधी फरक नाही पडला. मी पहिल्यांदा जहाजावर गेलो तेव्हा जहाजावर सगळ्या प्रकारची दारू स्वस्तात मिळायची. दारू पिऊन काम करत असल्याने जहाजावर अपघात आणि भांडणं होतात म्हणून एका मागोमाग सगळ्या कंपन्यांनी दोन वर्षात हार्ड लिकर बंद करून फक्त बियर आणि वाईन सुरु ठेवली. पण वाईन आणि बियर प्रमाणापेक्षा जास्त पिऊन सुद्धा अपघात आणि भांडणं व्हायला लागल्यावर बियर आणि वाईन सुद्धा बंद केली.

आज जवळपास 90 टक्के कंपन्यांची जहाजे पूर्णपणे अल्कोहोल फ्री आहेत. जहाज अल्कोहोल फ्री केल्यामुळे पूर्वी जहाजावर महिन्यातून किमान एकदा तरी होणारी पार्टी जवळपास बंद होत गेली. जहाजावर दारू आणि बियर मिळत असताना कोणाचा वाढदिवस किंवा एखाद क्षुल्लक निमित्त मिळालं कि पार्टी व्हायची. खलाशी आणि कॅडेट आणि काही अधिकारी रात्रभर पिऊन नाचत बसायचे. पण झिरो अल्कोहोल पॉलिसी मुळे जहाजावरच्या पार्ट्यासुद्धा संपवल्या गेल्या. पूर्वी कोणत्याही देशात कुठल्याही बंदरात गेल्यावर जहाज जेट्टीला लागलं की बाहेर फिरायला जायला मिळायचं. जेव्हापासून अमेरिकेवर दहशतवादी झाला तेव्हा पासून बऱ्याचशा देशात आणि बंदारांमध्ये बाहेर जायला मनाई केली जाऊ लागली. मोठं मोठी जहाज बनवली जात असल्याने त्यांना लहान बंदरात जाता येईनासे झाले. जहाजावरून पूर्वी घरी फोन करायचा झाला तर एक अमेरिकन डॉलर मध्ये फक्त एक मिनिटं बोलता यायचं. आजकाल बऱ्याचशा जहाजांवर वाय फाय किंवा इंटरनेट सुद्धा उपलब्ध असतं. सतत नवनवीन येणारे पर्यावरण संरक्षक नियम व कायदे यांच्यामुळे जहाजावर काम करणे अत्यंत जोखमीचे आणि तणावाचे झाले आहे.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनीयर
कोन, भिवंडी, ठाणे.

                                    लेख आवडला असल्यास   शेअर करा  ।   LIKE  करा  ।  कंमेंट करा 

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *