३० हजार २०९ रिक्त पदांसाठी भरती; ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम निश्चित करून ‘लॉक’ करणे आवश्यक
मुंबई, दि. ७ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ३० हजार २०९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुणवत्तेला प्राधान्य आणि पारदर्शकतेच्या तत्त्वावर ही भरती राबविण्यात येत असून, पात्र उमेदवारांना आता पदनिहाय पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली.
या भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी)–२०२५ ही २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले, तर १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.
पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध विभागांकडून रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदांच्या १३ हजार ३५१, महानगरपालिकांच्या १ हजार ९५४, नगर परिषद व नगरपालिकांच्या २८०, खासगी शैक्षणिक संस्थांच्या १२ हजार १४८, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांतील २ हजार ४२१ तसेच शासकीय विद्यानिकेतनमधील ५६ पदांचा समावेश असून, एकूण ३० हजार २०९ जागा भरल्या जाणार आहेत.
या एकूण पदांपैकी १९ हजार ८८१ पदांची भरती मुलाखतीशिवाय केवळ गुणवत्ता यादीनुसार होणार आहे. तर खासगी शैक्षणिक संस्थांमधील १० हजार ३२८ पदांसाठी मुलाखतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
वर्गनिहाय पदांचा विचार केला असता, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी १४ हजार ३२०, सहावी ते आठवीसाठी १० हजार १२, नववी व दहावीसाठी ५ हजार ५१३, तर अकरावी व बारावीसाठी ३६४ शिक्षक पदांचा समावेश आहे.
भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना संबंधित संकेतस्थळावर पदनिहाय पसंतीक्रम निश्चित करण्याची सुविधा ६ ऑगस्ट २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी आपला पसंतीक्रम नोंदवून तो ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत ‘लॉक’ करणे बंधनकारक आहे. त्यानंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी स्पष्ट केले.
भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना काही अडचणी, सूचना किंवा तक्रारी असल्यास त्या edupavitra25@gmail.com या ई-मेलद्वारे पाठविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया दीर्घकाळानंतर मोठ्या प्रमाणावर राबविली जात असल्याने हजारो पात्र उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने भरती पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित टप्पे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने उमेदवारांना केले आहे.
