नवी मुंबईतील ३२३ सफाई कामगारांना मध्य रेल्वेत सामावून घेण्यासह रेल्वे स्थानकांवरील समस्या सोडविण्याच्या सूचना
मुंबई, दि. ३० : मोरबे धरणामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या माध्यमातून पुनर्वसनाचा लाभ देण्याबाबत राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. बारवी धरणग्रस्तांच्या धर्तीवर मोरबे धरणग्रस्तांना थेट नियुक्ती देण्याच्या प्रस्तावासह नवी मुंबईतील सफाई कामगार आणि रेल्वे स्थानकांशी संबंधित विविध प्रश्नांवर कार्यवाही करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील नागरी सुविधांशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. वनमंत्री गणेश नाईक यांनीही मोरबे धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या.
मोरबे धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी बारवी धरणग्रस्तांना लागू करण्यात आलेल्या पद्धतीचा विचार करण्याचे निर्देश राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले. त्यानुसार प्रकल्पग्रस्तांना थेट नियुक्तीद्वारे सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारीतील १४ रेल्वे स्थानकांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू असताना, या स्थानकांवर दीर्घकाळ स्वच्छतेचे काम करणाऱ्या ३२३ सफाई कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही बैठकीत उपस्थित झाला. या कामगारांना मध्य रेल्वेच्या सेवेत सामावून घेण्याच्या शक्यतेबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित झालेल्या दगडखाण आणि क्रशर प्लॉटधारकांच्या पुनर्वसनाचाही विषय बैठकीत चर्चेला आला. संबंधित बाधितांना दिलासा देण्यासाठी पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्यास राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.
नेरूळ स्थानकातील अस्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न
नेरूळ रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छता, अतिक्रमणे, अमली पदार्थांची अवैध विक्री आणि गर्दुल्ल्यांचा वावर याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या समस्यांवर प्रभावी कारवाई करता यावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेला आवश्यक अधिकार हस्तांतरित करण्याची सूचना करण्यात आली.
स्थानकाच्या दोन्ही बाजूंना संरक्षण भिंत उभारून परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची जबाबदारी सिडकोने घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले. यामुळे स्थानक परिसरातील सुरक्षेसोबतच परिसराचे स्वरूप सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांशी संबंधित रस्ते, वाहतूक नियोजन आणि पार्किंग सुविधांचे प्रश्नही मार्गी लावण्यावर भर देण्यात आला. प्रवाशांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
मोरबे धरणग्रस्तांचे पुनर्वसन, विमानतळामुळे बाधित व्यावसायिकांचे प्रश्न आणि रेल्वे स्थानकांवरील सुविधांचा विकास अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. संबंधित यंत्रणांनी प्रस्ताव सादर करून पुढील कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
