Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नाशिक येथे आयोजित दुसऱ्या प्रादेशिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या परिषदेचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि प्रा. एस.पी. बघेल यांनी केले उदघाटन

समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी सिकलसेल – अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत या आजाराचे निर्मूलन करण्यासाठी काम करण्याचे डॉ. भारती पवार यांनी केले आवाहन

नाशिक, दि. ६: नाशिक येथे आयोजित दुसऱ्या  प्रादेशिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या परिषदेचे आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि प्रा. एस. पी. बघेल यांनी संयुक्तपणे उदघाटन केले. वाराणसी येथे डिसेंबर २०२२ मध्ये आयोजित पहिल्या प्रादेशिक समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या यशानंतर दुसऱ्यांदा ही परिषद आयोजित करण्यात येत आहे. यंदा पश्चिम भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश जसे की, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव यांसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली असून परिषदेची संकल्पना ‘समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात-सर्वांसाठी आरोग्याच्या दिशेने  वाटचाल ‘ अशी आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आपल्या नाशिक जिल्ह्यात, या परिषदेसाठी देशाच्या पश्चिम राज्यातून आलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे, स्वागत केले.  निरामयतेसाठी प्रोत्साहन, चाचण्यांच्या माध्यमातून लवकर आरोग्य निदान, चाचण्या आणि औषधांची उपलब्धता, देखभालीतील सातत्यासाठी टेलिकन्सल्टेशनसारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग यांसारख्या आरोग्य देखभाल सुधारणांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी अग्रणी भूमिका बजावत असल्याचे कौतुक डॉ. भारती  पवार यांनी केले.  सर्वांच्या उत्तम आरोग्याच्या सुनिश्चितीसाठी समुदाय आरोग्य अधिकारी समर्पणाने करत असलेले काम दीर्घकालीन लाभाचे असून देशाच्या प्रगती आणि समृद्धीची कोनशिला आहेत. मात्र आरोग्य सेवेत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपली व्यवस्था अधिक बळकट होणे गरजेचे असून यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे.

भारत सरकारने जशी वर्ष २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलनाची मोहीम हाती घेतली त्याचप्रमाणे वर्ष २०४७ पर्यंत सिकलसेल आजाराचे निर्मूलन करण्याची मोहीम हाती घेतली असल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

भारत सरकारने चार महत्वाच्या स्तंभांवर आधारित, ऐतिहासिक आयुष्मान भारत कार्यक्रम सुरू केला आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. – हे चार स्तंभ म्हणजे, आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्र, पीएम-जन आरोग्य अभियान, पीएम आयुष्मान भारत- आरोग्य पायाभूत सुविधा अभियान आणि आयुष्मान भारत डिजिटल अभियान. आयुष्मान भारत कार्यक्रमाचा मुख्य उद्देश, आरोग्य सुविधांची तळागाळापर्यंत १०० टक्के उपलब्धता आणि अंमलबजावणी करणे, त्यात सामुदायिक आरोग्य चिकित्सा नियोजनाला सहभागी करून घेणे आणि पर्यायाने, ‘आयुष्मान ग्राम पंचायत’ किंवा ‘आयुष्मान भाव’ अशा उपक्रमांचा दर्जा मिळवणे हा आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी पश्चिम भारतातील विविध राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातल्या सामुदायिक आरोग्य स्वयंसेवकांचे कौतुक करत, लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या, मानवतेप्रती त्यांच्या सेवाकार्याची प्रशंसा केली. कोरोना काळात, आरोग्याला गंभीर धोका असतांनाही, आपल्या देशातील आरोग्य कर्मचार्‍यांनी, डॉक्टरांपासून निमवैद्यकीय कर्मचारी, आणि परिचारिका ते रुग्णवाहिका चालकांपर्यंत, सर्वांनी समाजाची उत्कृष्ट सेवा केली होती.

महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी उद्घाटन सत्राला आभासी माध्यमातून संबोधित केले . केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि मिशन संचालिका, एल एस चांगसान आणि राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राचे कार्यकारी संचालक, मेजर जनरल अतुल कोतवाल आदि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या दोन दिवसीय परिषदेत, खालील चार संकल्पनांवर विशेष भर असेल: चिकित्सा आणि सार्वजनिक आरोग्य कार्ये, व्यवस्थापकीय कार्ये, समुदायांशी संपर्क साधणे तसेच आयुष एकत्रीकरण आणि आयटी उपक्रम. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी, पश्चिम विभागातील राज्यांचे मुख्य आरोग्य अधिकारी चार विषयांवर सादरीकरण करतील तसेच आरोग्य क्षेत्रातील प्रख्यात तज्ञ, सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवेवर मार्गदर्शन करतील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *