Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

देशातली धोरणं युवकांना केंद्रस्थानी ठेवून आखली जात असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद

“हा असा नवभारत आहे, जो नवनिर्मिती करण्यापासून मागे सरत नाही. धैर्य आणि दृढनिश्चय म्हणजे आज भारताचा ठसाच बनला आहे.”

नवी दिल्‍ली, दि.२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार योजनेच्या (PMRBP) पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.  ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून २०२२ आणि २०२१ या वर्षांसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP पुरस्कार) विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करण्यात आला. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई उपस्थित होते.

यावेळी, मध्य प्रदेश येथील इंदूर मधल्या मास्टर अवि शर्मा यांच्याशी संवाद साधत पंतप्रधानांनी रामायणाच्या विविध पैलूंद्वारे त्याने केलेल्या विपुल रचनांचे रहस्य जाणून घेतले. मास्टर अवी शर्मा म्हणाला की, लॉकडाऊन दरम्यान रामायण मालिका प्रसारित झाल्यामुळे त्याला याची  प्रेरणा मिळाली. अवीने त्याच्या निर्मितीतील काही ओव्याही म्हणून दाखवल्या. उमा भारती लहान असताना त्यांनी एका कार्यक्रमात अध्यात्मिक गहनता आणि ज्ञान प्रकट केले होते, त्याबद्दलच्या आठवणीचा एक प्रसंग पंतप्रधानांनी सांगितला. ते म्हणाले, की मध्य प्रदेशच्या मातीत असे काहीतरी आहे, जे अशा अत्युच्च प्रतिभेला जन्म देते. पंतप्रधानांनी अविला सांगितले की तो एक  प्रेरणास्थान बनला आहे आणि महान गोष्टी करण्यासाठी तुम्ही कधीही लहान नसता या उक्तीचे तो एक उदाहरण आहे.

कर्नाटकातील रेमोना इव्हेट परेरा हिच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी तिच्या भारतीय नृत्याबद्दलच्या आवडीबद्दल चर्चा केली. तिची आवड जोपासताना तिला येणाऱ्या अडचणींविषयी त्यांनी  जाणून घेतले. आपल्या मुलीची स्वप्ने साकार करण्यासाठी स्वतःवरील संकटांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पंतप्रधानांनी तिच्या आईचेही कौतुक केले. रेमोनाचे यश तिच्या वयापेक्षा खूप मोठे असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले, की कला ही देशाचे महान सामर्थ्य व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.

त्रिपुराच्या कुमारी पुहाबी चक्रवर्ती हिच्याशी बोलताना पंतप्रधानांनी तिच्या कोविडशी संबंधित नवसंकल्पनांची माहिती घेतली. खेळाडूंसाठी तयार केलेल्या फिटनेस ॲपबद्दल पंतप्रधानांना तिने माहिती दिली. पंतप्रधानांनी तिला तिच्या या प्रयत्नात शाळा, मित्र आणि पालकांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल विचारणा केली. खेळासाठी तसेच नाविन्यपूर्ण ॲप्स विकसित करण्यासाठी ती तिच्या वेळेचे संतुलन  कसे साधते याबद्दल पंतप्रधानांनी तिला प्रश्न विचारले.

बिहारच्या पश्चिम चंपारण्य येथील मास्टर धीरज कुमार यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी त्याने आपल्या धाकट्या भावाला मगरीच्या हल्ल्यातून वाचवलेल्या घटनेबद्दल प्रश्न  विचारले. आपल्या धाकट्या भावाला वाचवताना त्याची मनःस्थिती कशी होती आणि आता त्याला मिळालेल्या प्रसिद्धीनंतर त्याला कसे वाटते याबद्दल पंतप्रधानांनी विचारणा केली. पंतप्रधानांनी त्यांच्या धैर्याची आणि प्रसंगावधानतेची प्रशंसा केली. धीरजने पंतप्रधानांना सांगितले की, मला लष्करातील जवान होऊन देशाची सेवा करायची आहे.

पंजाबमधील मास्टर मीधांश कुमार गुप्ता यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी त्याने कोविड समस्या सोडवण्यासाठी तयार केलेल्या ॲपची माहिती घेतली. पंतप्रधान म्हणाले की मीधांश सारख्या मुलांमुळे उद्योजकतेला चालना देण्याच्या सरकारी प्रयत्नांना बळ मिळत आहे आणि नोकरी शोधणारे बनण्याऐवजी नोकरी देणारे होण्याची मानसिकता अधिक वाढत आहे असे त्यांना वाटते.

चंदीगड येथील कुमारी तरुशी गौर यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी खेळ आणि अभ्यास यांच्यातील समतोल कसा राखावा,यावर तिचे मत जाणून घेतले. तरूशी मुश्ठीयोद्धा मेरी कोमला आपला आदर्श मानते का? असा सवाल पंतप्रधानांनी केला. एक खेळाडू आणि आई म्हणून उत्कृष्टता आणि समतोल साधण्याच्या वचनबद्धतेमुळे तिला  मेरी कोम आवडते, असे तरुशीने पंतप्रधानांना सांगितले. खेळाडूंना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रत्येक स्तरावर जिंकण्याची मानसिकता निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

उपस्थितांना  संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या महत्त्वाच्या काळात हे पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे हे पुरस्कार अधिक महत्त्वपूर्ण झाले आहेत. ते म्हणाले की भूतकाळातून  ऊर्जा मिळवण्याची आणि अमृत काळाच्या पुढील २५ वर्षात उत्कृष्ट परिणाम साध्य करण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची हीच वेळ आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त देशातील मुलींना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास आणि वीर बाला कनकलता बरुआ, खुदीराम बोस आणि राणी गायडिनीलू यांच्या योगदानाचे स्मरण केले. “या स्वातंत्र्य सैनिकांनी लहान वयातच देशाच्या स्वातंत्र्याला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते आणि त्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी गेल्या वर्षी दिवाळीत जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा क्षेत्राला दिलेल्या भेटीची आठवण सांगितली, जिथे ते बलदेव सिंग आणि बसंत सिंग यांना भेटले, ज्यांनी स्वातंत्र्योत्तर युद्धात बाल सैनिकांची भूमिका बजावली होती. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता इतक्या लहान वयात त्यांच्या सैन्याला मदत केली. पंतप्रधानांनी या वीरांच्या शौर्याला अभिवादन केले.

पंतप्रधानांनी गुरु गोविंद सिंग यांच्या पुत्रांच्या शौर्य आणि बलिदानाची उदाहरणे दिली. जेव्हा साहिबजादांनी अपार शौर्यासह बलिदान दिले तेव्हा ते खूपच लहान होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारताची सभ्यता, संस्कृती, श्रद्धा आणि धर्मासाठी त्यांनी दिलेले बलिदान अतुलनीय आहे. पंतप्रधानांनी युवकांना साहिबजादांबद्दल आणि त्यांच्या बलिदानाबद्दल अधिक जाणून घेण्यास सांगितले.

दिल्लीतील इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा डिजिटल पुतळाही बसवण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. “आपल्याला नेताजींकडून सर्वात मोठी प्रेरणा मिळते. राष्ट्रसेवा प्रथम. नेताजींकडून प्रेरणा घेऊन तुम्हाला देशसेवेसाठी पुढे मार्गक्रमण करायचे आहे,” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात, धोरणे आणि उपक्रम युवकांना  केंद्रस्थानी ठेवतात. त्यांनी स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया बरोबरच आत्मनिर्भर भारताची लोक चळवळ आणि आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती यासारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. ते म्हणाले, हे भारतातील तरुणांच्या गतीशी सुसंगत आहे जे या नवीन युगाचे भारतात आणि देशाबाहेरही नेतृत्व करत आहेत. नवोन्मेष आणि स्टार्ट-अप क्षेत्रात भारताचे  वाढते सामर्थ्य  पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्रमुख जागतिक कंपन्यांचे नेतृत्व भारतीय तरुण मुख्य कार्यकारी अधिकारी करत असल्याबद्दल देशाला अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले. “आज जेव्हा आपण भारतातील तरुणांना स्टार्टअप्सच्या जगात सर्वोत्तम कामगिरी बजावताना पाहतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. आज भारतातील तरुण अभिनव संशोधन  करून , देशाला पुढे नेत आहेत, हे पाहतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो”, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, ज्या क्षेत्रांमध्ये मुलींना यापूर्वी परवानगीही नव्हती, तिथे आज मुली उत्तम कामगिरी बजावत आहेत. हा नवा भारत आहे, जो नवनवीन शोध लावण्यापासून मागे हटत नाही, धैर्य आणि दृढनिश्चय ही आजच्या भारताची वैशिष्ट्ये आहेत.

लसीकरण कार्यक्रमातही भारतातील मुलांनी आपली आधुनिक आणि वैज्ञानिक विचारसरणी दाखवल्याबद्दल  पंतप्रधानांनी कौतुक केले. ३, जानेवारीपासून आतापर्यन्त अवघ्या २० दिवसांत ४ कोटींहून अधिक मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली आहे. स्वच्छ भारत अभियानातील नेतृत्वाबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. व्होकल फॉर लोकलचे राजदूत बनून आत्मनिर्भर भारत मोहिमेचे नेतृत्व करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *