Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नंदूरबार येथे पौष्टिक ‘फोर्टीफाईड’ तांदूळ याविषयी जागृती करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन

नंदूरबार येथे पौष्टिक ‘फोर्टीफाईड’ तांदूळ याविषयी जागृती करणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन

नंदुरबार, दि. १३ : थॅलेसेमिया, सिकलसेल, ॲनिमिया या आजारांसाठी संवेदनशील असलेल्या पौष्टिक ‘फोर्टीफाईड’ तांदुळाविषयी जनसामान्यांना उद्भवलेल्या शंकाचे निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी आज नंदूरबार येथे आयोजित कार्यशाळा संपन्न झाली. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत असलेल्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या मोहिमेअंतर्गत आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, भारतीय खाद्य निगमचे उपमहाप्रबंधक अर्धदिपराय, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. एम. बावा, केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार, अन्न पुरवठा आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे एस.ओ. अविक भट्टाचार्य, सलीम दिवाण, स्टेट लिडर निलेश गंगावरे आदी उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, फोर्टिफाईड तांदुळाची माहिती जनसामान्यांना व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य कर्मचारी तसेच रेशन दुकानदारानी फोर्टीफाईड तांदुळाची माहिती जनसामान्यामध्ये पोहचवावी. जिल्ह्यात सिकलसेल, ॲनामियाचे रुग्ण असल्याने रक्तामधील लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी हे तांदुळ पौष्टिक असून या तांदुळाचा वापर कसा करावा याबद्दल स्थानिक भाषेत जनजागृती करुन फोर्टिफाईड तांदुळाचे महत्व सांगावे असे त्यांनी सांगितले.

जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार म्हणाले की, गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना फोर्टिफाईड तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे. फोर्टिफाईड तांदूळ हा नियमित तांदळासारखाच असून या तांदुळामध्ये फोर्टिफाईड तांदुळाचे प्रमाण १ किलोमध्ये १० ग्रॅम या प्रमाणात असते. लहान मुले, गर्भवती मातांच्या आहारामधील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता भरुन काढण्याकरिता फोर्टिफाईड तांदूळ देण्यात येतो. हा तांदुळ पोषक घटकांचा वापर करुन बनविण्यात आला असून या तांदुळामध्ये लोहखनिज, फोलिक ॲसिड विटामीन बी चे प्रमाण असल्यामुळे अधिकची पोषकतत्वे या तांदुळातून मिळतात. प्रक्रियायुक्त फोर्टिफाइड तांदुळाचे वजन नियमित तांदुळापेक्षा कमी असते. त्यामुळे हा तांदुळ पाण्यामध्ये वर तरंगताना दिसून येतो. हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यास गैरसमज करू नयेत. फोर्टिफाइड तांदूळ नियमित पद्धतीने शिजवावा. यासाठी कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपध्दती अवलंबण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सलीम दिवाण, निलेश गंगावरे यांनी फोर्टिफाईट तांदुळ तयार करण्याच्या पध्दतीविषयी माहिती दिली. या कार्यशाळेला तालुका वैद्यकीय अधिकारी, रेशन दुकानदार तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये पोषक तांदूळ फोर्टीफाईड विषयी जनजागृती करण्यासंदर्भात केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून चर्चासत्र आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *