Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शनिवारी-रविवारी जनता कर्फ्यू लावा; नागपूर मधील लोकप्रतिनिधींची मागणी

शनिवारी-रविवारी जनता कर्फ्यू लावा

सम-विषम नियम शिथिल करण्याची लोकप्रतिनिधींची मागणी : महापौर संदीप जोशी यांनी घेतला आढावा

नागपूर दि.१: नागपुरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक शनिवार आणि रविवार या दोन दिवस ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन करण्यात यावे आणि व्यापारपेठांसंदर्भात सम-विषम नियम शिथील करण्यात यावा, ९ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या मार्गावर हा नियम शिथील करण्यात यावा, ही मागणी नागपूरच्या लोकप्रतिनिधींनी महापौर संदीप जोशी यांच्याद्वारे आयोजित बैठकीत केली. महापौरांनी यासंदर्भात मनपा प्रशासनाला विचारपूर्वक योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले.कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना आरोग्य व्यवस्थेशी जो सामना करावा लागतो, ज्या संकटांना सामोरे जावे लागते, असे यापुढे घडणार नाही यादृष्टीने कोव्हिडकाळातील आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यावर भर देण्यात यावा. खासगी रुग्णालयांनीही रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच बिलाची आकारणी करावी. ज्यांच्या तक्रारी येतील त्या रुग्णांच्या बिलांचे थर्ड पार्टी ऑडीट करावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मनपा प्रशासनाला दिले.

कोव्हिडसंदर्भातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील आयुक्त कक्षात लोकप्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, आमदार कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., सत्तापक्ष उपनेते नरेंद्र बोरकर, वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, टाटा ट्रस्टचे डॉ. टिकेश बिसेन उपस्थित होते.

यावेळी सर्व आमदारांनी आरोग्य व्यवस्थेतील त्रुट्या सांगितल्या. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून मोठी रक्कम आकारली जाते. गरिबांचे हाल होत आहे, यावर नियंत्रण करण्यासाठी उपायुक्त स्तराची समिती तयार करा, असे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी शहरातील अनेक समाजभवन उपलब्ध होऊ शकतात. ज्यांच्या घरात व्यवस्था नाही, अशांना या ठिकाणी ठेवता येईल, अशी सूचना आमदार मोहन मते यांनी केली. आमदार प्रवीण दटके यांनी चाचणी केंद्र वाढविण्याची मागणी केली. शिवाय चाचणी झाल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णांना रिपोर्ट मिळतो तेथे ओपीडी आणि समुपदेशनाची व्यवस्था केल्यास रुग्णांची गैरसोय कमी होईल. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल, असे सांगितले. दक्षिण आणि पूर्व मतदारसंघात आर.टी.-पीसीआर चाचणीची व्यवस्था नाही. सक्करदारा आयुर्वेदिक रुग्णालय आणि नगर भवन येथे ही व्यवस्था करण्यावर विचार करावा, अशी सूचना केली. आ. विकास कुंभारे यांनी गांधीबाग झोनमध्ये शववाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना मांडली. यावर प्रशासनातर्फे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी भूमिका मांडली. आमदारांनी व मनपा पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे त्यांनी स्वागत केले. या संपूर्ण सूचना स्वागतार्ह असून तातडीने यावर अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले. सध्या ३४ चाचणी केंद्र असून लवकरच नव्याने १६ केंद्र सुरू करीत आहोत. प्रत्येक केंद्रांवर किमान १०० चाचण्या होतील, यादृष्टीने प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले. खासगी रुग्णालयासंदर्भात तक्रारी आल्या तर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

बेडस्‌च्या उपलब्धतेसाठी केंद्रीय कॉल सेंटर
रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने कुठे जावे, कुठल्या रुग्णालयात उपचार घ्यावेत, याबाबत रुग्णांमध्येच संभ्रम असतो. मात्र, नागपूर महानगरपालिकेने ही व्यवस्था केंद्रीय पद्धतीने केली आहे. ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर नागरिकांनी फोन केल्यास त्यांना बेड्‌सची उपलब्धता, खासगी रुग्णालयातील दर आदी माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांनी या क्रमांकाचा उपयोग करावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संयुक्तरीत्या केले आहे

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *