Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नागपुरातील पहिल्या पेटंट महोत्सवात १२२४ नवसंकल्पना सादर

“तरुणांच्या नवसंकल्पना साकारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १४: नवसंल्पनांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकेल अशा सर्व संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी तसेच या संकल्पना स्टार्टअपमध्ये रुपांतरित करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नव संशोधकांना दिली.

व्हिजन नेक्स्ट संस्थेच्यावतीने आयोजित बौद्धिक संपदा एकस्व (पेटंट) महोत्सवातील प्रतिनिधिक संशोधनकर्त्यांचा सत्कार येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, माजी महापौर तथा व्हिजन नेक्स्टचे प्रमुख संदीप जोशी मंचावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, नवसंकल्पना व संशोधनामध्ये युवा पिढी मोठ्या प्रमाणात सहभागी होत असून भारतामध्ये यामाध्यमातून स्टार्टअपची संख्या वेगाने वाढत आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इको सिस्टीम म्हणून भारताकडे बघितले जात आहे. पेटंटचे महत्व लक्षात घेवून राज्य शासनाने विशेष धोरण तयार केले आहे. या धोरणाचा लाभ घेऊन बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत मोठया प्रमाणात पेटंटची नोंदणी होत आहे. नागपुरातील एका व्यक्तीकडे ५२ पेटंट आहेत ही कौतुकास्पद बाब असल्याचे नमूद करत युवकांनी आपले संशोधन व नवसंकल्पना स्टार्टअपमध्ये परावर्तीत कराव्यात, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

जगातील महत्त्वाची स्टार्टअप इको सिस्टीम म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. जनतेचे जीवन सुलभ होण्यासाठी विविध संशोधन होत आहेत.या सर्व संशोधन व  कल्पनानांचे  पेटंट होणे गरजेचे आहे. भारताने हळदीचे पेटंट मिळविण्यासाठी जागतिक स्तरावर लढाई केली व जिंकली.तेव्हा देशाला पेटंटचे महत्त्व कळले व त्या दिशेने देशात प्रयत्न सुरू झाले.

भारतात ९० हजार स्टार्टअप आणि १०० युनीकॉन आहेत. यापैकी १६ हजार स्टार्टअप आणि २५ युनीकॉन महाराष्ट्रातील आहेत, याचे समाधान असल्याचे फडणवीस म्हणाले. आर्टिफिशिअल इंटेलिजंटचा उपयोग व्यवस्था उभारण्याकरिता केला जाऊ शकतो. तरुणांच्या नवसंशोधन व कल्पनांचा उपयोग करून स्टार्टअप उभरा यासाठी महाराष्ट्र शासन पूर्ण मदत करेल. नागपुरातील आयआयएम मध्ये यासाठी तरुणांना मार्गदर्शन करण्यात येईल.बदलत्या काळानुसार कौशल्य आत्मसात करून नवीन उद्योग उभारण्यासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले, बौद्धिक संपदा कायद्यांशिवाय नवकल्पना व संशोधन अडगडीत पडून राहिले असते. भारतात बौद्धिक संपदा कायद्यांसदर्भात वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आल्या. पेटंट हे नवकल्पना व नवनिर्मितीसाठी महत्त्वाचे आहे. देशात स्टार्टअप्स इंडिया या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. नागपुरातील या पेटंट महोत्सवाचे अप्रूप वाटते. अशा प्रकारचे महोत्सव आयोजित करून नवकल्पना व नव संशोधनास प्रोत्साहन द्यावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

प्रारंभी व्हिजन नेक्स्ट संस्थेचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी स्वागत करुन पेटंट महोत्सवाविषयी सविस्तर माहिती दिली. अशा प्रकारचा महोत्सव संपूर्ण राज्यात राबविला जावा तसेच नागपूर येथे इनोवेशन कनव्हेशन सेंटर सुरु होवून युवकांना एका ठिकाणाहून पेटंट करण्यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळावी यासाठी पुढाकार घेण्यात येईल, अशी माहिती दिली.

या महोत्सवाची ठळक वैशिष्ट्ये

  • १०८ कॅम्पस मधील जवळपास ६० हजार विद्यार्थ्यांपर्यंत या महोत्सवाद्वारे पोहचण्यात आले.
  • १२२४ पेटंट सादर झाले.
  • ११० तज्ज्ञ व वैज्ञानिकांनी ज्युरी म्हणून या महोत्सवात काम पाहिले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *