“मिसिंग लिंक पेक्षा ‘कनेक्टिंग लिंक’ संबोधणे जास्त संयुक्तिक” – मुख्यमंत्री
रायगड-अलिबाग, दि. १ : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे आज लोकार्पण करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प केवळ रस्ता नसून आधुनिक भारतीय अभियांत्रिकीचा जागतिक स्तरावरील नमुना असल्याचे सांगितले. “हा ‘मिसिंग लिंक’ नसून प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारा ‘कनेक्टिंग लिंक’ आहे,” असे ते म्हणाले.
लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून प्रवाशांचा किमान २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. खोपोली ते कुसगाव दरम्यानचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार असल्याने इंधन बचत, वेळेची बचत आणि आर्थिक गती या तिन्ही बाबींमध्ये राज्याला मोठा फायदा होईल. या प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला सुमारे ७० हजार कोटी रुपयांचा अप्रत्यक्ष लाभ होईल, असा दावाही त्यांनी केला.
या ऐतिहासिक सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, एमएसआरडीसीचे अधिकारी तसेच प्रकल्पाशी संबंधित तज्ज्ञ उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाच्या तांत्रिक वैशिष्ट्यांवर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, या मार्गावर अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, वॉटर मिस्ट सिस्टीम, दर ५० मीटरवर आपत्कालीन दूरध्वनी सुविधा तसेच दर ३०० मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे विशेष ‘कनेक्टर्स’ तयार करण्यात आले आहेत. एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडल्यास दुसऱ्या बोगद्यातून प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढता येईल, अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे.
संपूर्ण मार्गावर चोवीस तास सीसीटीव्ही देखरेख आणि ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यरत करण्यात आली असून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना थेट ई-चलन पाठवले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत, दऱ्या, घाट आणि जंगल परिसरातून हा प्रकल्प उभारण्यात आला. सात देशांतील तज्ज्ञ संस्था आणि कंपन्यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण झाल्याची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सर्व अभियंते, अधिकारी आणि कामगारांचे विशेष कौतुक केले. कोविड काळातील अडचणींवर मात करून महायुती सरकारने या कामाला गती दिली आणि अखेर सुमारे ७ हजार १८१ कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी काही तासांपूर्वी व्यक्त केलेल्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या अनुभवाचाही उल्लेख केला. “सुप्रियाताई, तुम्ही आज शेवटच्यांदा ट्रॅफिकमध्ये अडकलात. आता हा मार्ग सुरू झाल्यानंतर घाटात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल,” असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात या प्रकल्पाला “अभियांत्रिकी आणि राजकीय इच्छाशक्तीचा संगम” असे संबोधले. “हा प्रकल्प एखाद्या व्यक्तीचे यश नसून हजारो कामगार, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या मेहनतीचे फलित आहे,” असे ते म्हणाले. भूमिपूजनावेळी स्वतः एमएसआरडीसी मंत्री म्हणून उपस्थित असल्याची आठवण करून देत आज लोकार्पणावेळीही तेच खाते आपल्या ताब्यात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी या प्रकल्पातील २३.५ मीटर रुंदीच्या बोगद्याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याचा विशेष उल्लेख केला. “हा प्रकल्प केवळ रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीचे प्रतीक आहे,” असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, घाटातील तीव्र वळणे टाळल्यामुळे दररोज सुमारे एक कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. यामुळे प्रदूषण कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल आणि उद्योग, व्यापार तसेच पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील या नव्या ‘कनेक्टिंग लिंक’ प्रकल्पामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून मुंबई-पुणे हा ज्ञान, उद्योग आणि तंत्रज्ञानाचा पट्टा अधिक वेगाने विकसित होईल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.
