मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार
पुणे, दि. १३ : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात आज सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तीन वारकरी भगिनींना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात शासन सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.
या अपघातात तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक वारकरी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून बचाव, उपचार आणि मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या वारकऱ्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
यावेळी त्यांनी उपचाराधीन वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या. अपघातातील मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असून, सर्व जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येतील. आवश्यकतेनुसार अतिरिक्त आर्थिक मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष जयदीप दिलीप बारभाई, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, श्री भावार्थ देखणे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या की, “जखमी वारकऱ्यांच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासन अपघातग्रस्त वारकरी व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.”
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून पूर्वतयारीचा नियमित आढावा घेण्यात येत असून, वारी मार्गावरील आवश्यक सुविधा आणि कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यापूर्वीच प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
यावेळी वाहनचालकांनाही त्यांनी विशेष आवाहन केले. “पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने वाहने चालवून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी,” असे आवाहन उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी केले.
या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक यंत्रणा समन्वयाने मदतकार्य राबवत असून, जखमी वारकऱ्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, प्रभावित वारकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याची भूमिका राज्य शासनाने स्पष्ट केली आहे.
