Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आज महात्मा फुलें यांची जयंती, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

आज महात्मा फुलें यांची जयंती, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला.

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतिराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.

२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.

महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य व साल :

१) इ.स.१८५१ चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.

२) इ.स.१८५२ मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.

३) इ.स.१८५२ पूना लायब्ररीची स्थापना

४) इ.स.१८५२ १५ मार्च वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

५) इ.स.१८५२ १६ नोव्हेंबर मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

६) इ.स.१८५३ ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स’ स्थापन केली.

७) इ.स.१८६० विधवा विवाहास साहाय्य केले.

८) इ.स.१८६३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.

९) इ.स.१८६४ गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला

१०) इ.स.१८६५ विधवांच्या केशवपानाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

११) इ.स.१८६८ दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

१२) इ.स.१८७३ २४ सप्टेंबर सत्यशोधक समाजची स्थापना केली.

१३) इ.स.१८७५ शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले.

१४) इ.स.१८८० दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

१५) इ.स.१८८८ ११ मे मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *