Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“…तेच विषाचे प्रयोग पुन्हा महाराष्ट्रावर नकोत” – ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत

वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या नेत्यांना अप्रत्यक्ष टोला

मुंबई, दि.१: आज १ मे. आजच्याच दिवशी १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. याच पार्श्वभूमीवर माजी राज्यसभा सदस्य व वरिष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून वेगळ्या विदर्भाची वेळोवेळी मागणी करणाऱ्या विदर्भवादी नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

वाचा नेमकं काय म्हणाले आहेत भारतकुमार राऊत

जय ‘अखंड’ महाराष्ट्र!

आज महाराष्ट्र दिन. आपल्या महाराष्ट्र राज्याचा ६२वा वर्धापन दिन. ज्या कार्यकर्त्यांच्या त्यागामुळे व १०६ सत्याग्रहींच्या हौतात्म्यामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन करणे तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भाग पडले, त्या सर्वांना आदरांजली!

कोरोना महामारीच्या भयामुळे आज उत्सवी वातावरण नाही, हे खरे. पण हे दिवसही जातील व पुढील वर्षी दुप्पट उत्साहाने आपण ‘महाराष्ट्र दिन साजरा करू, ही उमेद आहेच.

१९५६ पासून सतत साडे चार वर्षे मराठी भाषकांचे स्वतंत्र राज्य व्हावे व मुंबई हीच त्या राज्याची राजधानी असावी म्हणून मराठी जनतेने एका बाजूला केंद्र सरकार व दुसऱ्या बाजूला अमराठी पुंजीपती यांच्याविरुद्ध एकोप्याने लढा दिला व तो यशस्वीही झाला. सेनापती बापट, साथी एस एम जोशी, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, ना. ग. गोरे व त्यांच्या साथीला शाहीर अमर शेख, शाहीर साबळे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर विठ्ठल उमप, शाहीर लिलाधर हेगडे या व अशा कलाकारांच्या जत्थ्यांनी सारा महाराष्ट्र उठवला. त्यामुळेच महाराष्ट्राचा मंगल कलश तेव्हाचे मुंबई द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना मुंबईत आणता आला. हजारो मराठी भाषकांनी त्याचे स्वागत केले.

आता ६२ वर्षांनी अनेक प्रश्न मनात येतात. आंदोलन व त्याग आणि बलिदानांमुळे महाराष्ट्रात मुंबई आली खरी, पण मुंबईत महाराष्ट्र उरला का? हा प्रश्न आजच स्वत:ला विचारायला हवा. महाराष्ट्र ही संतांची, शूरांची, त्यागाची व प्रतिभेची भूमी. या महाराष्ट्राने भारताला सर्व क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. पण त्याच्या मोबदल्यात इथल्या गरीब जनतेला काय मिळाले? मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी समाज व मराठी संस्कृती या साऱ्यांचीच जर सर्वत्र हेटाळणी व कुचेष्टाच होत असेल, तर ‘महाराष्ट्र’ मिळवुन आपण काय साधले, याचाही विचार हवा.

त्यातच राजकीय पक्षांचेच विचारवंत जर महाराष्ट्राचे कधी दोन तुकडे, तर कधी चार तुकडे करण्याची भाषा जाहीरपणे करत असतील तर महाराष्ट्राचे नजीकच्या भविष्यात काय होणार, या शंकेची पाल चुकचुकत राहतेच.

अखंड व संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडणाऱ्यांची थोडी तरी आठवण आपण ठेवली, तर असे प्रयत्न उधळून टाकायला हवेत. त्यात पक्षीय राजकारण वा वैयिक्तक स्वार्थाचा प्रश्नच नाही. जर मूळ अस्तित्त्वावरच कुणी प्रश्नचिन्ह निर्माण केले, तर त्यासाठी केवळ तार्किक चर्चा हा उपाय असूच शकत नाही. मराठी समाजाने राजकारण्यांच्या सहाय्याने वा त्यांच्याशिवाय एकत्र येऊन अशी कटकारस्थाने हाणून पाडायला हवीत.

‘छोटी राज्ये, सबल राज्ये’ वगैरे उपमा व हे युक्तिवाद किती पोकळ आहेत, हे उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, गोवा वगैरे राज्यांतील राजकीय बजबजपुरी, अस्थैर्य व भ्रष्टाचार यांनी दाखवून दिलेच आहेत. तेच विषाचे प्रयोग पुन्हा महाराष्ट्रावर नकोत.

म्हणूनच आज महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावरच या राज्य व संस्कृतीवर प्रेम करणाऱ्यांनी हातात हात गुंफून गर्जू या, ‘जय महाराष्ट्र! अखंड महाराष्ट्र!!’

– भारतकुमार राऊत

(साभार श्री. भारतकुमार राऊत फेसबुक वॉल)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *