महाबळेश्वर येथे अत्याधुनिक हवामान रडार कार्यान्वित; अचूक अंदाजासाठी ‘मिशन मौसम’ला बळ
मुंबई, दि. २६ : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेमार्फत महाबळेश्वर येथे अत्याधुनिक एक्स-बँड ड्युअल-पोलरायझेशन डॉप्लर हवामान रडार कार्यान्वित करण्यात आले असून, यामुळे राज्यातील हवामान अंदाज अधिक अचूक व तत्काळ देणे शक्य होणार आहे. ‘मिशन मौसम’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या या प्रणालीचे उद्घाटन पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्या हस्ते करण्यात आले.
पश्चिम घाटातील सुमारे १४०० मीटर उंचीवर वसलेल्या महाबळेश्वर येथील उच्च उंची मेघ भौतिकी प्रयोगशाळेत बसवण्यात आलेले हे रडार ‘हवामानाचा डोळा’ म्हणून कार्य करणार आहे. पाऊस, ढग, वादळे तसेच स्थानिक हवामानातील झपाट्याने होणारे बदल यांचा प्रत्यक्ष वेळेत मागोवा घेण्यासाठी ही प्रणाली सतत वातावरणाचे निरीक्षण करणार आहे.
विशेषतः अचानक पडणारा मुसळधार पाऊस, दाट धुके आणि वेगवान वाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या डोंगराळ भागात हवामानातील बदलांचे अचूक निरीक्षण करणे आता अधिक सोपे होणार आहे. या रडारमुळे सातारा, पुणे, कोकण आणि मुंबई परिसरात सुमारे ३ तासांपर्यंतचा अल्पकालीन हवामान अंदाज अधिक सक्षमपणे देता येणार आहे.

९.४५ गिगाहर्ट्झ वारंवारतेवर कार्य करणारे हे रडार उच्च विश्वासार्हता, ऊर्जा कार्यक्षमतेसह कमी देखभाल खर्चात सातत्याने कार्य करू शकते. दुहेरी-ध्रुवीकरण तंत्रज्ञानामुळे ढगांची रचना, पावसाचे प्रमाण, थेंबांचे आकार वितरण आणि वादळांची अंतर्गत संरचना यांचा सखोल अभ्यास करता येणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटर आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे उपग्रह आणि जमिनीवरील निरीक्षण प्रणालींचे एकत्रीकरण करून हवामान अंदाजाची अचूकता वाढविणे, वातावरणातील सूक्ष्म घटकांचे प्रमाणीकरण सुधारणे आणि वीज, अभिसरण प्रक्रिया तसेच हवामान बदलाशी संबंधित संशोधनाला चालना देणे शक्य होणार आहे.
यावेळी डॉ. एम. रविचंद्रन यांनी सांगितले की, “पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या भागात पूर्वसूचना प्रणाली मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. या रडारमुळे वेळेवर इशारे देणे शक्य होईल आणि स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांची सुरक्षितता वाढेल.”
संस्थेचे संचालक डॉ. ए. सूर्यचंद्र राव यांनी नमूद केले की, या प्रणालीमुळे हवामान अंदाज वर्तवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून हवामान बदलाच्या अभ्यासालाही नवी दिशा मिळेल. तसेच अंतराळ उपयोजन केंद्राच्या संचालिका सौम्या एस. सरकार यांनी सांगितले की, या सहकार्यामुळे उपग्रह व भौम निरीक्षण तंत्रज्ञानाचा संगम साधून देशाची हवामान निरीक्षण प्रणाली अधिक सक्षम होईल.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे रडार पर्जन्य प्रक्रिया, वादळांची उभी रचना आणि तीव्र हवामान परिस्थितींचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कार्यात्मक पातळीवर पूर, भूस्खलन यांसारख्या आपत्तींसाठी पूर्वसूचना, विमान वाहतूक सुरक्षा, कृषी सल्ला आणि जलसंपदा नियोजन यांना मोठी मदत होणार आहे.
एकूणच, हवामान अंदाज अधिक अचूक करण्यासोबतच आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी देशाच्या क्षमतेत वाढ करणारे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.



